विश्वास निकम
गोवे-कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड खांब दरम्यान पुगाव जवळ पडलेल्या भयानक खड्ड्यात बुधवारी रात्री आठच्या सुमारास एका दुचाकीस्वाराचा अपघात घडला. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून दुचाकीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या भयानक खड्ड्यात प्रवाशांचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का? असा संतप्त सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली तेरा वर्ष रखडले आहे. मे महीन्यात इंदापूर ते वडखळ या मार्गावर करोडो रुपये खर्च करून डांबरीकरण करण्यात आले तर गेली पंधरा दिवस पडलेल्या पावसामुळे मोठा खड्डा पडल्याने रात्रीच्या सुमारास कोलाडकडून नागोठणेकडे प्रवास करणाऱ्या एका दुचाकीस्वाराची गाडी सदरील खड्ड्यात आपटत दुचाकी दुभाजकावर फेकली गेल्याने अपघात झाल्याने तो गंभीर जखमी झाला असून दुचाकीचे खूप नुकसान झाले आहे. वाहनचालकांसह प्रवाश्यांच्या जिवाला या खड्डयांमुळे धोका निर्माण झाला असुन सदरील खड्ड्यात प्रवाशांचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का? अशी संतप्त भावना प्रवाशी व्यक्त करताना दिसत आहेत.
गेली तेरा वर्ष मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. आता सर्वसामान्यांनी तसेच कोकणवासियांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. कोरोडो रुपये खर्च करून देखील महामार्गाची स्थिती गंभीर आहे. इंदापूर ते पळस्पे मार्ग हा अत्यंत धोकादायक बनला असून त्यामुळे प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. जीवघेण्या खड्ड्यांमुळे अनेक वाहने अडकून बंद पडल्याने अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वी कोलाड पुई नजिक महीसदरा नदीपात्र पुलावर खूप मोठा खड्डा पडला होता तिथे देखिल अपघात घडला होता. त्याची दखल रोहा तहसीलदार यांनी घेत ताबडतोब तो खड्डा बुजविण्याचे आदेश दिले तदनंतर खड्डा भरला गेला परंतु कोलाड खांब दरम्यान खूपच खड्डे पडले असून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पुगाव नजिक पडलेला खड्डा तसेच इतर खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत.
–विशाल मोहिते
ग्रामस्थ, पुई