मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात मोठ्या प्रमाणावर लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जात आहे. मात्र, या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी वितरित केल्यामुळे इतर खात्यांना निधीच्या व्यवस्थापनात अडचणी येत असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मान्य केले आहे.
आरोग्यमंत्र्यांचे वक्तव्य
माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले की, लाडकी बहिण योजनेसाठी दिल्या गेलेल्या निधीमुळे इतर खात्यांना अपेक्षित प्रमाणात आर्थिक सहाय्य मिळत नाही. त्यामुळे सर्व खात्यांना निधीची कसरत करावी लागत आहे. अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक विभागाला आवश्यक असलेला निधी मिळालेला नाही, त्यामुळे काही विभागांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मंत्री संजय शिरसाट यांचा दावा
याआधी मंत्री संजय शिरसाट यांनी देखील लाडकी बहिण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला गेला असल्याचा दावा केला होता. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्यावर आरोप करताना सांगितले की, या योजनेसाठी इतर विभागांचा निधी वापरण्यात आला आहे, त्यामुळे काही योजनांना निधी मिळण्यात विलंब होत आहे.
सरकारची भूमिका
आरोग्यमंत्री आबिटकर यांनी असेही स्पष्ट केले की, सुरुवातीच्या टप्प्यात काही अडचणी आल्या असल्या तरी आता परिस्थिती सुधारत आहे. पुढील टप्प्यात लाडकी बहिण योजना आणि इतर योजनांसाठी निधीची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल, असे त्यांनी सांगितले