पुणे : राज्यात मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी प्रकल्प, नोकऱ्या गुजरातला पळवल्या जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर केला जात आहे. त्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठी अस्मितेवरून वातावरण तापलं असतााना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात अमित शहा यांच्यासमोरच जय गुजरातची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात जयराज स्पोर्ट्स आणि कव्हेशन सेंटरचा उद्घाटन समारंभ हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पाडला. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. त्यावेळी भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा केली. एकनाथ शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ घोषणेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका
एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात ही घोषणा दिल्यानंतर संजय राऊतांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रुप आज बाहेर आले आहे. पुण्यात या महाशयांनी अमित शाह समोर “जय गुजरात “ ची गर्जना केली आहे. काय करायचे? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा, हजार माराव्या आणि एक मोजाव्या. हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? असा सवाल करत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
रामदास कदमांची नाराजी
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे जय गुजरात का म्हणाले माहीत नाही. पण त्यांनी असे म्हणायला नको होते, मला ते आवडलं नाही. अशा शब्दात रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांना फटकारलं आहे. रामदास कदम हे नेहमीच स्पष्ट बोलता. त्यांच्या बोलण्याने अनेक वेळा पक्षाच्या नेत्यांचीही कोंडी झाली आहे. अनेक वेळा त्यांनी थेट भाजप विरोधात ही भूमीका घेतली आहे. यावेळी तर त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावरच नाराजी व्यक्त केली आहे.
एकनाथ शिंदे चुकीचं बोलले नाहीत, फडणवीसांकडून शिंदेंची पाठराखण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू उचलून धरत सारवा-सारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की मी तुम्हाला आठवण करून देतो, शरद पवार हे कर्नाटक येथे जय कर्नाटक म्हटले होते. जिथं जोतो, तिथं जय बोलतो. तो कार्यक्रम गुजरातचा कार्यक्रम होता. त्यामुळे एकनाथ शिंदे तिथे जय गुजरात बोलले असं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला. ते पुढे म्हणाले मराठी माणूस संकोचित नाही. वैश्विक विचार आपल्याला करावा लागेल असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
