कार्ला (प्रतिनिधी): आगरी-कोळी बांधवांसह राज्यभरातील भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवीच्या मंदिरात ड्रेस कोडचे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ७ जुलैपासून या नव्या नियमांची अंमलबजावणी होणार असून अंगप्रदर्शन करणाऱ्या कपड्यांतील भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश नाकारण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे प्रमुख व खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी दिली.
भक्तांच्या मागणीनुसार निर्णय
ड्रेस कोड संदर्भात सोशल मीडियावर भाविकांनी व्यक्त केलेल्या सूचनांना प्रतिसाद म्हणून विश्वस्त मंडळाने कार्ला येथे झालेल्या बैठकीत एकमताने हा ठराव संमत केला. मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कसला असेल ड्रेस कोड?
⛔ बंदी असलेले कपडे:
- शॉर्ट्स, मिनी स्कर्ट, फाटकी जीन्स, वेस्टर्न स्टाइलचे अंगप्रदर्शन करणारे कपडे
✅ अनुमती असलेले कपडे:
- महिला व मुलींसाठी: साडी, सलवार-कुर्ता, पूर्ण अंग झाकणारे पारंपरिक भारतीय पोशाख
- पुरुष व मुलांसाठी: धोतर-कुर्ता, पायजमा, पँट-शर्ट, टी-शर्ट (पूर्ण अंग झाकणारे)
मंदिर कर्मचाऱ्यांसाठीही निर्देश
विश्वस्त मंडळाकडे आलेल्या तक्रारीनुसार, दर्शनाच्या वेळेस काही कर्मचारी भाविकांशी असभ्य वर्तन करतात, त्यामुळे कर्मचाऱ्यांना नम्र व्यवहार करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
भाविकांना आवाहन
“देवीचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिरातील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे,” असे आवाहन खासदार बाळ्या मामा यांनी भाविकांना केले आहे.