• Mon. Jan 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भाषेच्या मुद्द्यावरून आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य

ByEditor

Jul 5, 2025

बाळासाहेब असतानाही ठाकरे ब्रँड नसल्याची टीका

लातूर : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मंचावर आल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. भाषेच्या विषयावर बोलताना त्यांनी छत्रपती संभाजीराजे आणि शिवाजी महाराज यांच्या बहुभाषिकतेचा उल्लेख करत, “संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का?” असा प्रश्न उपस्थित केला. हा सवाल अनेकांना खटकला असून सामाजिक स्तरांवर प्रतिक्रियांचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना अतिशयोक्ती?

हाडोळती येथे झालेल्या सभेत आमदार गायकवाड म्हणाले, “जगात टिकायचं असेल तर अनेक भाषा शिकायला हव्यात. शिवराय, संभाजी महाराज, तसेच ताराराणी, येसूबाई – हे सर्व बहुभाषिक होते. त्यांची बुद्धिमत्ता व अवगत ज्ञान हा महाराष्ट्राचा गौरव आहे.” मात्र त्यांनी वापरलेल्या काही शब्दांमुळे संतापाचा सूर उमटतोय.

राज-उद्धव एकत्र येण्यावर राजकीय टीका

विजय सभेच्या निमित्ताने ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यावर गायकवाड म्हणाले, “जर हे पंधरा वर्षांपूर्वीच एकत्र आले असते, तर राजकीय परिस्थितीत फरक पडला असता. बाळासाहेबांच्या काळात ‘ठाकरे’ नावाचा ब्रँड नसता तर 288 जागा का जिंकल्या नाहीत?” असे म्हणत त्यांनी ठाकरे ब्रँडच्या प्रभावावरही शंका उपस्थित केली.

मराठी भाषेच्या अस्मितेचा मुद्दा

मराठी बोलण्याची लाज बाळगणाऱ्यांवर तोफ चालवत गायकवाड म्हणाले, “जो कोणी महाराष्ट्रात राहून मराठी बोलण्याची लाज वाटतो असे म्हणतो, त्याचे थोबाड फोडले पाहिजे.” तसेच पाकिस्तानचा दहशतवाद समजून घेण्यासाठी उर्दूची जाण आवश्यक असल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले.

वाद निर्माण होण्याची शक्यता

गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल गैरप्रकाराने टिप्पणी झाली असल्याचा आरोप होत असून ऐतिहासिक व्यक्तींच्या संदर्भातील अशा विधानांना अधिक संवेदनशीलतेने हाताळण्याची गरज असल्याचे अनेकांनी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!