दिघाटी गावात घरफोडी, पोलीस चोरट्यांच्या शोधत
अनंत नारंगीकर
उरण : चिरनेर परिसरात वाहने चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराच्या अंगणात पार्किंग करुन ठेवलेली मोटारसायकल अंधाराचा फायदा उठवत चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि. ७) पहाटेच्या सुमारास घडली आहे. तर ज्या मोटारसायकली चालू झाल्या नाहीत त्या चिरनेर – दिघाटी या रस्त्याच्या कडेला टाकून पळ काढल्याची घटना घडली आहे. तसेच दिघाटी गावात अज्ञात चोरट्यांनी घरातील पैसे अंधाराचा फायदा उठवत घेऊन पोबारा केल्याची घटना घडली असून पोलीस यंत्रणा अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.
चिरनेर गावातील रहिवासी महादेव परदेशी व अविनाश म्हात्रे यांच्या घराच्या अंगणात पार्किंग करुन ठेवलेली मोटारसायकल अंधाराचा फायदा उठवत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि. ७) पहाटेच्या (४.२० वा.) सुमारास घडली आहे. महादेव परदेशी यांची मोटारसायकल अंधाराचा फायदा उठवत चोरुन नेण्यात चोरट्यांना यश आले आहे. मात्र, अविनाश म्हात्रे यांची मोटारसायकल चालू न झाल्याने सदरची मोटारसायकल रस्त्याच्या कडेला टाकून चोरट्यांनी पोबारा केला आहे. रस्त्याला लागून जे लोक राहतात, त्यांचीच वाहने त्यांनी चोरली आहेत. जेणेकरून वाहन चोरल्यानंतर सुसाट वेगाने पळून जाता यावे, असा त्यांचा उद्देश असावा. ‘धूम’ चित्रपटाप्रमाणे ही योजना अज्ञात चोरट्यांनी आखली आहे. मात्र सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

या घटनेसंदर्भात उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून उरण पोलीस यंत्रणा चोरट्यांचा शोध घेत आहे. तर पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दिघाटी गावात अज्ञात चोरट्यांनी घरातील सामानाची नासधूस करत पैसे चोरुन नेण्याची घटना ही सोमवारी दिघाटी रस्त्यालगत घडली आहे. तसेच अज्ञात चोरट्यांनी दिघाटी रस्त्याच्या कडेला मोटारसायकल टाकून पळ काढला आहे. सदर मोटारसायकल ही महादेव परदेशी यांची नसल्याने त्यांची मोटारसायकल चोरीला गेली असल्याची माहिती महादेव परदेशी यांच्या कडून मिळत आहे. या दोन्ही घटना संदर्भात पोलीस यंत्रणा चोरट्यांचा शोध घेत आहेत.