• Sat. Jul 12th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा बदल: जयंत पाटील यांचा राजीनामा, शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष

ByEditor

Jul 12, 2025

मुंबई : महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार गट) मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. जयंत पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता शशिकांत शिंदे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 15 जुलै रोजी शशिकांत शिंदे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. गेल्या काही दिवसांआधी जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन मुक्त करा, अशी मागणी केली होती.

मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा अशी मागणी जयंत पाटील यांनी 10 जून रोजी झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनीच केली होती. मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. शरद पवारांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असं जयंत पाटील म्हणाले होते. त्यानंतर आज जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद मिळणार असल्यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध होताच शशिकांत शिंदे यांनी एबीपी माझा सोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून नाव निश्चित नाही, पवार साहेब, सुप्रिया ताई, जयंत पाटील आणि पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. 15 तारखेला पक्षाची बैठक आहे, काही नावं चर्चेत आहेत, माझंही नाव चर्चेत आहेत. ज्यावेळेला निर्णय होईल, निवड होईल त्यावेळी निश्चितपणानं काम करु, असं शशिकांत शिंदे म्हणाले. शशिकांत शिंदे पुढं म्हणाले, आणखी कुणाची नावं चर्चेत आहेत याबद्दल कल्पना नाही. मला तुमच्याकडून कळलेलं आहे. संघटनेच्या माध्यमातून पवारसाहेबांनी या महाराष्ट्रात इतिहास घडवला काम केल, पक्ष संघटना बांधली आहे. आज पक्षाच्या माध्यमातून काम करण्याच्या बाबतीत संघर्षाचा काळ आहे. त्यावेळेला निश्चितपणानं लोकांना अपेक्षित अशा प्रकारचं नेतृत्व पवार साहेबांनी उभं केलेलं आहे. जयंत पाटील यांच्या सारख्या अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे, त्याची तुलना होऊ शकत नाही, असंही शिंदे यांनी म्हटलं. प्रदेशाध्यक्षपदाबाबत पक्षाचा अजून निर्णय झालेला नाही, पक्षाची बैठक आहे एवढाच निरोप आलेला आहे. निर्णय काय होईल तो होईल, पक्ष बांधण्याच्यासाठी संघर्षात आम्ही एकजुटीनं, एकोप्यानं उभं राहू, साहेबांच्या पक्षाची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न 100 टक्के करु, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

बेरोजगारीचा प्रश्न आहे, आश्वासनं आहेत, 75 हजार नोकऱ्या लगेच देतो, निवडणुका आल्या की आश्वासनांची खैरात होईल हे लोकांना पटवून द्यायचं आहे. इनकमिंग आऊटगोईंग होत असते, नवीन लोकांना संधी देणे त्यांच्याकडन नेतृत्व उभं करणं हा साहेबांचा गुण आहे. कोण जातंय, लगेच यश मिळालं पाहिजे यापेक्षा, राजकीय सामाजिक चळवळीत लोक इच्छुक आहेत त्यांना पुढं आणलं तर महाराष्ट्रात बदल घडवण्याची क्षमता आहे. सत्ता बदलते दिसल्यावर बरेच लोक मार्ग बदलात. सध्याच्या प्रकरणांवरुन जनता नाराज आहे हे तुम्हाला दिसून येईल, असं शशिकांत शिंदे म्हणाले. मला जर संधी मिळाली तर ते भाग्य समजेन, शरद पवार साहेब माझे दैवत आहेत. प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर आर. आर. पाटील यांच्या सारखं काम करण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यात मोठं आव्हान शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं आहे. युवक वर्गाचे प्रश्न आहेत. या मुद्यांवर काम करावे लागेल, असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!