मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळ परिसरात काल घडलेली घटना ही लोकशाहीला लज्जास्पद ठरावी अशी आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात झालेल्या वादातून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये थेट तुफान हाणामारी झाली. या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राज्याच्या राजकारणातील सभ्यता आणि संवादाचा स्तर खालावल्याची गंभीर चिंता व्यक्त होत आहे.
घटना कालच्या दिवशी विधानभवनाच्या लॉबीत घडली, जिथे दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हातघाईचे प्रकार घडले. याआधी बुधवारच्या दिवशी विधानभवन गेटजवळ पडळकर आणि आव्हाड यांच्यात जोरदार वाद झाला होता. या वादात एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप आव्हाडांनी केला होता, ज्यामुळे वाद अधिक चिघळला.
कैद झालेला वाद आणि संतप्त प्रतिक्रिया वादाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात आव्हाड ‘जा जा’ म्हणत पडळकरांना सुनावत आहेत. तर दुसरीकडे, पडळकर यांनी ‘तुझ्यासारखी कुत्री घेऊन फिरत नाही’ असे अपमानास्पद वक्तव्य केले आहे. ही भाषा जनतेच्या प्रतिनिधींपासून अपेक्षित नाही, अशी प्रतिक्रिया विविध स्तरातून उमटत आहे.
जितेंद्र आव्हाड यांचा आरोप वादानंतर आव्हाड यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, पडळकर यांनी गाडीचा दरवाजाला लाथ मारली होती आणि त्यामुळे दोघांनाही लागले. “अशा छोट्या गोष्टीकडे लक्ष न देता मी पुढे गेलो, पण त्यांनी शिवीगाळ सुरू केली. गाडी आमच्यावर आणण्याचा प्रकारही होता,” असं त्यांनी म्हटलं. त्यांनी ‘मंगळसूत्र चोर’ ओरडल्यामुळे पडळकर भडकले, असा त्यांचा दावा आहे.
आपल्या वैयक्तिक राजकीय भूमिकेवर टीका करताना पडळकर यांनी ‘अर्बन नक्षल’ असा उल्लेख केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. ते म्हणाले, “मस्ती करायची असेल तर सहन करण्याची तयारी ठेवा. कार्यकर्त्यांनी जो रंग दाखवायचा तो दाखवला.” त्यांनी सत्ताधाऱ्यांनी माज दाखवू नये असा सल्ला देत आपला संघर्षमय राजकीय प्रवास सांगितला. “४० वर्ष मुंबईत बाप नसताना मी राजकारणात आहे.”
घटनेनंतर वातावरण शांत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मध्यस्थी केली, मात्र घटनेमुळे विधीमंडळाच्या प्रतिष्ठेवर ओरखडा उमटल्याचे मानले जात आहे.