मुंबई : राज्यात एकिकडे पावसाळी अधिवेशन सुरु आहे तर दुसरीकडे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल ऑफर दिल्यानंतर थेट बंद दाराआड उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही बड्या नेत्यांची अचानक भेट झाल्यामुळे राज्यात राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरेंह आदित्य ठाकरे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची अँटी चेंबरमध्ये भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तासाची चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये विधान परिषदेचे सभापतील राम शिंदे यांच्या दालानामध्ये भेट झाली. यामुळे राज्यात चर्चेला उधाण आले आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते पद, त्रिभाषा सूत्र आणि हिंदीसक्ती संदर्भात उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे.
हिंदीची सक्ती हवीच कशाला? हे पुस्तक उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले. तसेच, हेच पुस्तक नव्याने नेमण्यात आलेल्या समिती अध्यक्ष नरेंद्र जाधव यांना आपण द्यावे, असं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं. तर, विधानसभा विरोधी पक्षनेतेपद हे विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. मात्र, हे विरोधी पक्षनेतेपद अजूनही दिलं जात नाहीये, त्या संदर्भाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांच्यासोबत अँटी चेंबरमध्ये चर्चा केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे काही आमदार देखील उपस्थित होते.