नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आरोग्य कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचे उपराष्ट्रपती कार्यालयाने अधिकृतरित्या जाहीर केले.
धनखड यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,
“मी वैद्यकीय सल्ल्यानुसार माझ्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 67(अ) नुसार भारताच्या उपराष्ट्रपतीपदाचा तात्काळ आणि प्रभावीपणे राजीनामा देत आहे.”
आपल्या कार्यकाळाबद्दल त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ, तसेच संसद सदस्यांचे आभार मानले.
“तुमच्या अचल पाठिंब्याबद्दल आणि माझ्या कार्यकाळात आपण जपलेल्या अद्भुत संबंधांबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. मला पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाकडून लाभलेले सहकार्य अमूल्य होते आणि त्यातून मी खूप काही शिकलो,” असे ते म्हणाले.
त्यांनी भारताच्या प्रगतीचेही विशेष कौतुक केले.
“आपल्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मिळालेले अनुभव माझ्यासाठी मौल्यवान आहेत. भारताच्या जागतिक वाढीबद्दल मला अभिमान आहे आणि तिच्या उज्ज्वल भविष्याबाबत मी पूर्णपणे आशावादी आहे.”
धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आला असून, तो तात्काळ लागू झाल्याचे समजते.