Nimisha Priya : ग्लोबल पीस इनिशिएटिव्हचे संस्थापक आणि प्रसिद्ध धर्मप्रचारक डॉ. के.ए. पॉल यांनी येमेनच्या सना येथून एका व्हिडिओ संदेशात दावा केला आहे की, येमेनी आणि भारतीय नेत्यांच्या अनेक दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर भारतीय नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे.
त्यांनी आपल्या संदेशात येमेनी नेत्यांचे त्यांच्या “ठोस आणि प्रार्थनापूर्ण प्रयत्नां”बद्दल आभार मानले. मूळतः केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या निमिषाला 2020 मध्ये तिचा येमेनी व्यावसायिक भागीदार तलाल अब्दो मेहदी याच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते आणि तेव्हापासून ती तेथील तुरुंगात आहे. तिला 16 जुलै रोजी फाशी दिली जाणार होती, जी नंतर पुढे ढकलण्यात आली होती.
डॉ. पॉल म्हणाले की, नेत्यांनी गेल्या दहा दिवसांपासून दिवस-रात्र अथक प्रयत्न केले आहेत. ते म्हणाले, “मी त्या सर्व नेत्यांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी निमिषाची फाशी रद्द करण्यात मोठे यश मिळवले आहे. देवाच्या कृपेने तिची सुटका केली जाईल आणि तिला भारतात नेले जाईल. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आभार मानू इच्छितो की त्यांनी आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना पाठवण्याची आणि निमिषाला व्यावसायिक पद्धतीने सुरक्षितपणे परत आणण्याची तयारी केली आहे.”
दुसरीकडे, केरळचे मुस्लिम विद्वान आणि ज्येष्ठ मुफ्ती कंथापुरम एपी अबूबकर मुसलियार यांची इच्छा आहे की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 37 वर्षीय नर्स निमिषाचा मुद्दा उचलावा, कारण चर्चा आता पुढील टप्प्यात पोहोचली आहे.