मुंबई – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट घातल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट असे दोन स्वतंत्र राजकीय गट अस्तित्वात आले. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले असले तरी, या निर्णयाविरोधातील वाद अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात या प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्याचे संकेत दिले असून, १५ सप्टेंबरनंतर सुनावणीची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी एक मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
‘शिंदे यांची पक्षकारकीर्द संपेल” – असीम सरोदे
असीम सरोदे यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, “सर्वोच्च न्यायालयाचे कायद्याचे हात आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द येत्या महिनाभरात संपवतील. मनमानी पद्धतीने पक्ष फोडणे, पळवणे ही असंविधानिक कृती आहे आणि ती न्यायालयात टिकणार नाही.”
सरोदेंनी राज्यपाल, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यावरही टीका करत म्हटले की, “असंविधानिक प्रक्रियेतून सरकार स्थापन करण्यात राज्यपालांनी सक्रिय सहभाग घेतला, निवडणूक आयोगाने कायद्याच्या बाहेर जाऊन निर्णय घेतला आणि विधानसभा अध्यक्षांनी पक्षपातीपणे वागून बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यासाठी मदत केली. यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते हे पाहणे महत्त्वाचे आहे.”
सुनावणी लांबणीवर, अंतिम निर्णय सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर अंतिम निर्णय न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. मात्र, सूर्यकांत हे घटनापीठाचे सदस्य असल्यामुळे शिवसेना प्रकरणाची सुनावणी १९ ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान लांबणीवर पडली आहे. त्यामुळे १५ सप्टेंबरनंतर किंवा ऑक्टोबरमध्येच अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे.