भंडारा – भंडारा जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील निवडणुकांनंतर एका कार्यक्रमात भाजप आमदार परिणय फुके यांनी “शिवसेनेचा मीच बाप आहे” असे वादग्रस्त विधान केल्याने महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. या विधानामुळे शिंदेसेना कार्यकर्त्यांत तीव्र संताप उसळला असून, त्यांनी २४ तासांत माफीची मागणी करत नाहीतर ‘शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं जाईल’ असा इशारा दिला आहे.
भाजपच्या मेळाव्यात बोलताना परिणय फुके म्हणाले, “अनेकजण माझ्यावर आरोप करतात, पण मी उत्तर देत नाही. त्या दिवशी लक्षात आलं की, जर मुलगा चांगले गुण मिळवतो, तर कौतुक त्याच्या आईचं होतं. पण जर मुलाने वाईट केलं, तर दोष बापालाच दिला जातो. त्यामुळे कळलं की शिवसेनेचा बाप मीच आहे, कारण नेहमी खापर माझ्यावरच फोडलं जातं.”
या विधानावर शिवसेनेत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. शिंदेसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी संयमित भूमिका घेत म्हणाले, “एखाद्या व्यक्तीचं विधान हे पक्षाचं अधिकृत मत नसतं. युती सरकारमधील नेत्यांनी जबाबदारीने बोलायला हवं. लोकांनी मोठ्या अपेक्षेने आपल्याला निवडून दिलं असून, आपलं लक्ष जनसेवेवर असलं पाहिजे.”
दरम्यान, शिंदेसेना कार्यकर्त्यांनी १२ तासांत माफी मागावी, अन्यथा परिणामांना सामोरे जावं लागेल, असा थेट इशारा दिला आहे. परिणय फुके यांचं विधान महायुतीतील सत्तासंयोगावर दबाव निर्माण करणारे ठरू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.