केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) च्या ‘प्रोजेक्ट मन’ उपक्रमांतर्गत आतापर्यंत ७५ हजारांहून अधिक जवानांना मानसिक आरोग्याशी संबंधित मदत पुरवण्यात आली आहे. या उपक्रमामुळे समुपदेशन सेवा आणि गरजेनुसार वेळीच हस्तक्षेप करत जवानांचे मानसिक बळ वाढवण्यात यश आले आहे. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम म्हणजे आत्महत्येच्या घटनांमध्ये ४० टक्क्यांची घट झाली आहे.
सीआयएसएफचे उपमहानिरीक्षक व मुख्य जनसंपर्क अधिकारी अजय दहिया यांनी सांगितले की, महानिरीक्षक आर. एस. भाटी यांच्या पुढाकाराने ही योजना २०२४ मध्ये सीआयएसएफ आणि एव्हिएशन युनिट्समध्ये सुरू करण्यात आली. ७५,१८१ जवान व त्यांच्या कुटुंबीयांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. याशिवाय १,७२६ अधिकारी व अधीनस्थ कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे, जेणेकरून ते मानसिक समस्येची वेळेत ओळख करून योग्य मार्गदर्शन करू शकतील. या उपक्रमामुळे आतापर्यंत ३०,८९५ जवानांची मानसशास्त्रीय चाचणी झाली असून त्यानंतर योग्य सल्ला, उपचार व मदतीच्या सुविधा दिल्या गेल्या आहेत.
महानिरीक्षक भाटी यांनी स्पष्ट केले की, जवानांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे शारीरिक तंदुरुस्तीसारखेच महत्त्वाचे आहे. त्यांनी पुढे सांगितले की ही योजना आतंरिक सहकार्य व्यवस्था अधिक मजबूत करते.
मागील तीन वर्षांत, ‘प्रोजेक्ट मन’ अंतर्गत ७५,०००हून अधिक जवानांना मानसिक आरोग्य सेवा, समुपदेशन, सहकार्य आणि हेल्पलाईनद्वारे मदत करण्यात आली आहे. गंभीर प्रकरणांमध्ये विशेषज्ञांपर्यंत वेळेत पोहोचणे, संवेदनशील एककांमध्ये जागरूकता पसरवणे आणि समस्या वेळेत ओळखणे, हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.