• Tue. Sep 9th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोहा तालुक्यात स्मार्ट प्रीपेड मीटरला शेकापचा तीव्र विरोध

ByEditor

Aug 13, 2025

वीज ग्राहकांच्या घरात मीटर बसवू देणार नाही; अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा

विश्वास निकम
कोलाड :
रोहा तालुक्यात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून (महावितरण) ग्राहकांना न विचारता पारंपरिक मीटर बदलून स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याच्या निर्णयाला शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) जोरदार विरोध दर्शविला आहे. याबाबत १३ ऑगस्ट रोजी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक सभागृह, रोहा येथे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय सभा घेण्यात आली.

सभेत ठराव घेऊन कार्यकारी अभियंता, महावितरण, रोहा यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची सक्ती तात्काळ रद्द करावी, आधीपासून बसवलेले स्मार्ट मीटर काढून जुन्या इलेक्ट्रॉनिक मीटरची पुर्नजोडणी कंपनीच्या खर्चाने करावी, तसेच स्मार्ट मीटरमुळे आलेली भरमसाठ वीज बिले रद्द करावीत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

शंकरराव म्हसकर म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्मार्ट मीटर सक्तीने बसवू नये, असे स्पष्ट सांगितले आहे. तरीसुद्धा रोहा तालुक्यात ग्राहकांच्या परवानगीशिवाय मीटर बसवले जात आहेत. हा अन्याय सहन केला जाणार नाही. स्मार्ट मीटर लावण्याचा प्रयत्न झाला, तर शेकाप उग्र आंदोलन छेडेल.”

निवेदनातील प्रमुख मागण्या:
  • स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याची सक्ती तात्काळ रद्द करावी
  • आधी बसवलेले स्मार्ट मीटर काढून जुन्या मीटरची पुर्नजोडणी करावी
  • स्मार्ट मीटरमुळे आलेली अतिरिक्त बिले रद्द करावीत
  • स्मार्ट मीटर बसवलेल्यांची यादी देऊन त्यांना मीटर रद्द करण्याची लेखी हमी द्यावी

निवेदन सादर करताना शेकापचे राज्य कार्यकारणी सदस्य शंकरराव म्हसकर, तालुका चिटणीस शिवराम महाबळे, मजूर फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष हेमंत ठाकूर, मारुती खांडेकर, तुकाराम खांडेकर, पुरोगामी रोहा तालुका युवक अध्यक्ष संतोष दिवकर, संदेश विचारे, दीपक दाईटकर, लक्ष्मण चव्हाण, विनायक धामणे, सोहेल अधिकारी, अरविंद भिलारे आदी उपस्थित होते.

कार्यकारी अभियंता प्रदीप दाळू यांच्यावतीने श्रावणकुमार वेमूला यांनी निवेदन स्वीकारले. “हे निवेदन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून आपल्या भावना लेखी स्वरूपात कळवू,” असे त्यांनी आश्वासन दिले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!