अलिबाग | अमुलकुमार जैन
अलिबाग तालुक्यातील थळ येथील बीच वॉक रिसॉर्टमध्ये झालेल्या धक्कादायक घटनेत स्विमिंग पूलमध्ये शॉक लागून श्रीनिवास म्हात्रे (वय ४२, रा. किहीम, ता. अलिबाग, जि. रायगड) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवास म्हात्रे यांनी दहा दिवसांच्या गणरायाचे विसर्जन केल्यानंतर रविवारी (दि. ७ सप्टेंबर २०२५) आपल्या नातेवाईकांसह थळ येथील बीच वॉक या रिसॉर्टमध्ये मौजमजा करण्यासाठी भेट दिली होती. बीच वॉक रिसॉर्ट सध्या विनोद गुप्ता यांनी भाड्याने घेतले असून, सुट्टीच्या दिवशी अनेक पर्यटक येथे येतात.
म्हात्रे पूलमध्ये पोहत असताना अचानक त्यांना विजेचा धक्का बसला. काही क्षणातच ते बेशुद्ध पडल्याचे पाहून नातेवाईकांनी आणि रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले. तातडीने त्यांना अधिक उपचार मिळावेत म्हणून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अलिबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद आकस्मिक मृत्यू (A.D.) म्हणून करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भुंडेरे करत आहेत.
श्रीनिवास म्हात्रे हे किहीम परिसरातील सामाजिक वर्तुळात ओळखले जाणारे व्यक्ती होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबीय, नातेवाईक तसेच गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.