उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या समीकरणांची चर्चा
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एकाच दिवशी अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहोचले. ही भेट जवळपास पाऊण तास चालली. राज्यातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तथापि, कालच पार पडलेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंचा झालेला पराभव आणि त्यानंतरची ही भेट यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली, मात्र राज ठाकरे यांच्याबाबत त्यांनी संयम दाखवला. काही नेत्यांच्या वक्तव्यांमधून त्यांच्याबाबत सहानुभूती आणि सॉफ्ट कॉर्नर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भाजपला अजूनही राज ठाकरे आपल्या गोटात परततील, अशी अपेक्षा असल्याची चर्चा रंगली. त्याच पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर गेले, यामुळे या बैठकीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.
दरम्यान, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील राज्यात हालचाली सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्याअंतर्गत त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला असल्याचं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. “फडणवीसांनी ठाकरेंना मतदानासाठी विनंती केली. त्याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचाही फोन उद्धव ठाकरेंना आला होता. फडणवीसांवर चर्चा करण्याची जबाबदारी आहे. त्यांनी इतर नेत्यांनाही फोन केले असतील, ते त्यांचं कामच आहे,” असं संजय राऊत म्हणाले.
राज ठाकरे–फडणवीस भेटीबाबत विचारलं असता राऊत म्हणाले, “राज ठाकरे आणि फडणवीस अनेकदा भेटतात. कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील किंवा राज्यातील प्रश्नांवर चर्चा केली असेल. विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले, चर्चा झाली असेल तर होऊ द्या.”
बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे बंधूंवर झालेला पराभव, भाजपची उद्धव ठाकरेंवर केंद्रित टीका, तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्याकडे दाखवलेला सॉफ्ट कॉर्नर आणि त्याच दिवशी झालेली ही महत्वाची भेट…या सर्व गोष्टींमुळे राज ठाकरे पुन्हा भाजप आणि महायुतीच्या समीकरणात सामील होणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राजकीय वर्तुळात आता चर्चा आहे की, राज ठाकरे यांनी अद्याप भाजप–महायुतीकडील दारे पूर्णपणे बंद केलेली नाहीत. त्यामुळे आज झालेली फडणवीस–राज ठाकरे बैठक नेमकी कोणत्या विषयावर झाली, यातून कोणते नवे राजकीय समीकरण पुढे येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
