जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डिसेंबर महिन्यात होण्याची चिन्हे दिसत आहेत. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारीला सुरूवात केली असून आरक्षणाचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी १ ऑक्टोबर २०२५ रोजी मतदारसंघांच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार ३० ऑक्टोबर २०२५ रोजी अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रकाशित होणार आहे. तसेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयातील नोडल अधिकारी यांनी प्रत्येक टप्प्यावरील कामकाजाबाबत आयोगाला अहवाल सादर करणे बंधनकारक ठरविण्यात आले आहे.
असा असेल आरक्षणाचा कार्यक्रम
- ६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत : अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी राखीव जागांबाबतचा प्रस्ताव विहित नमुन्यात तयार करून विभागीय आयुक्तांकडे सादर करणे.
- ८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत : संबंधित प्रस्तावास मान्यता देणे.
- १० ऑक्टोबर २०२५ : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण महिलांसाठी राखीव जागांच्या आरक्षण सोडतीची सूचना वृत्तपत्रांत प्रकाशित करणे.
- १३ ऑक्टोबर २०२५ : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी आरक्षण सोडत काढण्यात येईल.
- १४ ऑक्टोबर २०२५ : प्रारूप आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध करणे.
- १४ ते १७ ऑक्टोबर २०२५ : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी.
- २७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत : प्राप्त हरकती व सूचनांचा गोषवारा तयार करून विभागीय आयुक्तांकडे सादर करणे.
- ३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत : सर्व हरकतींचा विचार करून आरक्षण अंतिम करणे.
- ३ नोव्हेंबर २०२५ : अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रकाशित होणार.
