‘शहीद कॅप्टन विनायक गोरे’ एकपात्री लघुनाटिकेचा 5000 वा प्रयोग सादर; विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू
जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांचा अखंड 30 वर्षांचा प्रेरणास्त्रोत
मुंबई (प्रतिनिधी) : विद्याविहार येथील के.जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचा 66 वा वर्धापनदिन देशभक्तीच्या अमर भावनेत उत्साहात पार पडला. या विशेष सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, मागील तीन दशकांपासून देशभक्तीची ज्योत विद्यार्थ्यांच्या मनात चेतवणारे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी ‘शहीद कॅप्टन विनायक गोरे’ या एकपात्री लघुनाटिकेचा 5000 वा प्रयोग सादर केला. सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे, अभिमानाचे अश्रू चमकले.

लघुनाटिकेतील प्रत्येक संवादात शौर्य, प्रत्येक प्रसंगात त्यागाची गंधकथा झळकत होती. शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या जीवनकथेवर आधारित या प्रयोगातून गेल्या तीस वर्षांत हजारो विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा मिळाली आहे. रक्तदान, अवयवदान, सैनिकांच्या कुटुंबांचा सन्मान, ध्वजदिन निधी संकलन अशी विविध समाजोपयोगी कामे या प्रेरणेवर फुलली.
कार्यक्रमात प्राचार्य डॉ. किशन पवार यांच्या हस्ते प्रख्यात वक्ते व शिक्षणतज्ज्ञ डॉ. पवन अग्रवाल, वीरमाता अनुराधा गोरे, माजी मुख्याध्यापिका सुमन शिवाजी सानप, हिंदी साहित्यातील राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ. सतीश पांडे, लेफ्टनंट कर्नल सतीशकुमार सिंग, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा वर्षा भोसले यांच्यासह अनेक मान्यवर माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

डॉ. पवन अग्रवाल यांनी आपल्या मनोगतात कॉलेज जीवनापासूनच्या यशस्वी प्रवासाचे अनुभव कथन करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. वीरमाता अनुराधा गोरे यांनी मनोज सानप यांच्या निष्ठेचे कौतुक करत, “त्यांच्या नाटिकेमुळे अनेक तरुण सैन्यात दाखल झाले, तर असंख्यांनी समाजसेवा सुरू केली,” असे सांगितले.
या सोहळ्यात महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आतिश तौकरी, डॉ. हेमाली संघवी, डॉ. महेंद्र मिश्रा, डॉ. अनंत द्विवेदी, तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य डॉ. पवार यांनी सानप यांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले.
26 सप्टेंबर 1995 रोजी शहीद कॅप्टन विनायक गोरे यांनी 27 व्या वर्षी मातृभूमीसाठी बलिदान दिले. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 27 सप्टेंबर रोजी मनोज सानप यांनी पहिल्यांदा ही लघुनाटिका सादर केली होती. आज 5000 व्या प्रयोगाद्वारे ती विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची प्रेरणा चेतवणारी ठरली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक सिमरन महतानी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. मीरा वेंकटेश यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
