मुंबई : शिवसेना पक्षाच्या नाव आणि चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईचा आता निर्णायक टप्पा आला आहे. उद्या (८ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय धुरळा उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटासाठी ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, निकाल त्यांच्या बाजूने लागला तर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतात. निवडणूक आयोगाने यापूर्वी पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं, “धनुष्यबाण हे शिवसेनेचं मूळ चिन्ह आहे. ते हिरावलं गेलं, ही संविधानिक चोरी आहे. सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला तर पक्षाचं नाव आणि चिन्ह परत उद्धव ठाकरे यांना मिळालं पाहिजे. नाही दिलं, तरी निदान ते गोठवावं,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.
तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावर प्रत्युत्तर देताना म्हटलं, “राम आमच्याकडे आहे, त्यामुळे धनुष्यबाणही आमच्याकडेच राहील.”
शिवसेना पक्षफुटीला आता जवळपास तीन वर्षे उलटली आहेत. या प्रकरणी निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोर अनेक सुनावण्या पार पडल्या आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटातील आमदारांना पात्र ठरवण्याचा निर्णय दिला होता, ज्याला देखील सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे.
आता उद्याच्या अंतिम सुनावणीत सर्वोच्च न्यायालय कोणता निर्णय देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर कोर्टाने या प्रकरणात तातडीचा निकाल दिला, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
