मुंबई | प्रतिनिधी
पावसाळी अधिवेशनादरम्यान गाजलेल्या आमदार निवासातील कँटिन प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. शिळं आणि निकृष्ट अन्न दिल्याचा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी कँटिन चालकाला मारहाण केल्यानंतर संबंधित अजिंठा केटरर्सचा परवाना रद्द करण्यात आला होता, मात्र केवळ महिन्याभरातच त्याच कँटिनला अन्न व औषध प्रशासनाकडून क्लीनचीट देण्यात आली आहे.
कँटिनमध्ये अवैध पदार्थ नसल्याचा अहवाल
अन्न व औषध प्रशासनाच्या तपासानुसार कँटिनमध्ये कोणतेही अवैध किंवा निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आढळून आले नाहीत, असा अहवाल देण्यात आला आहे. परिणामी, रद्द केलेला परवाना पुन्हा मंजूर करण्यात आला असून कँटिनचे कामकाज पूर्ववत सुरू झाले आहे.
‘राडा’नंतर गाजलेले अधिवेशन
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कँटिनमध्ये शिळे अन्न दिल्याच्या आरोपावरून थेट राडा घालत कँटिन चालकाला मारहाण केली होती. या घटनेचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले होते. “आमदार निवासातच अन्नाची अशी अवस्था असेल, तर सर्वसामान्यांना काय दिलं जात असेल?” असा सवालही त्यावेळी गायकवाड यांनी उपस्थित केला होता.
परवाना रद्द कारवाई स्थगित
या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने अजिंठा केटरर्सचा परवाना रद्द करत गंभीर कारवाई केल्याचे दाखवले. परंतु, आता तीच कारवाई स्थगित करण्यात आली असून कँटिनला पुन्हा परवाना देण्यात आला आहे.
‘बदनामी व्यर्थ ठरली’ अशी चर्चा
महिन्याभरातच कँटिनला क्लीनचीट मिळाल्याने “विनाकारण कँटिनला बदनाम करण्यात आले का?” असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली आहे की, आमदार गायकवाड यांच्या आरोपांमुळे गाजलेले प्रकरण अखेर ‘फोल ठरले’, आणि प्रशासनाने केलेली कारवाई ही दबावाखाली घेतलेली घाईची पावले होती, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
