• Wed. Feb 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणच्या आर्यनची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड

ByEditor

Nov 25, 2025

तालुक्यातील पहिला “इंटरस्कुल” आणि “इंटर युनिव्हर्सिटी” पातळीवर चमकणारा जलतरणपटू

उरण | घन:श्याम कडू
उरण तालुक्याचा जलतरणपटू आर्यन विरेश मोडखरकर याने युनिव्हर्सिटी निवड चाचणीत उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. उरण तालुक्यातून “इंटरस्कुल” तसेच “इंटर युनिव्हर्सिटी” या दोन्ही पातळ्यांवर राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणारा आर्यन हा पहिला जलतरणपटू ठरला आहे. आर्यनने यापूर्वी विविध स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत स्वतःला सतत सिद्ध केले आहे. त्याच्या सातत्यपूर्ण यशामुळे तो ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे, त्या वीर तू. ह. वाजेकर उच्च महाविद्यालयात त्याचा विशेष सत्कार करण्यात आला आहे.

समुद्राने वेढलेल्या उरण तालुक्यात पोहण्याला विशेष महत्त्व आहे. आर्यनने आपली जलतरणाची कारकीर्द उरण नगरपरिषदेच्या जलतरण तलावात सुरू केली. त्याची क्षमता आणि जिद्द ओळखून प्रशिक्षक हितेश भोईर यांनी त्याला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी स्वीकारली.

सातत्याने सराव करत आर्यनने अनेक स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवले आणि याच जोरावर त्याने प्रथम इंटरस्कुल राष्ट्रीय पातळी गाठली. त्यानंतर युनिव्हर्सिटी निवड प्रक्रियेत उत्कृष्ट प्रदर्शन करून त्याने राष्ट्रीय संघात स्थान मिळवले.

आर्यन सध्या बीएससी आयटी (दुसरे वर्ष) शिकत आहे. १५ ते १७ सप्टेंबरदरम्यान डोंबिवलीतील पलावा सिटी जलतरण तलाव येथे झालेल्या युनिव्हर्सिटी निवड चाचणीत त्याने राष्ट्रीय स्पर्धेत आपले स्थान पक्के केले.

राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धा १८ ते २३ डिसेंबर दरम्यान चेन्नई येथील डॉ. टी. आर. परिवेंद्र अक्वाटिक कॉम्प्लेक्स येथे होणार आहेत. महाराष्ट्रातून निवडलेल्या १० मुली आणि १० मुलांच्या संघात आर्यनची निवड झाली असून, तो ५० मीटर बॅकस्ट्रोक आणि ५० मीटर बटरफ्लाय या जलतरण प्रकारत राज्याचे नेतृत्व करणार आहे. उरण तालुक्यातून पहिल्यांदाच अशा दुहेरी पातळीवर राष्ट्रीय स्पर्धेत झेप घेणाऱ्या आर्यनच्या या कामगिरीने संपूर्ण तालुका अभिमानाने उजळून निघाला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!