यशश्री शिंदे प्रकरणात कुटुंबाला न्याय; ८ लाखांची मदत आणि अनुष्का शिंदेला शासकीय नोकरी प्रदान
उरण | विठ्ठल ममताबादे
उरणमधील बहुचर्चित यशश्री शिंदे हत्या प्रकरणाला आता न्यायाच्या दिशेने एक महत्त्वाचे वळण मिळाले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता करत, पीडित कुटुंबाला ८ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील सदस्य अनुष्का शिंदे हिला शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.

महाड येथील ऐतिहासिक ‘चवदार तळे सत्याग्रह दिना’चे औचित्य साधून २० मार्च २०२६ रोजी विजय स्तंभ येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनुष्का शिंदे हिला शासकीय नोकरीचे परिपत्रक सुपूर्द करण्यात आले. यशश्रीच्या हत्येनंतर आठवले यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते आणि मदतीचे आश्वासन दिले होते, ज्याची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे.
