• Thu. Mar 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण नगरपालिकेचा कोट्यवधींचा घोटाळा विधानसभेत गाजला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले चौकशीचे आदेश

ByEditor

Mar 26, 2026

​उरण | घन:श्याम कडू
उरण नगरपरिषदेत ‘भाडे आणि टेंडर’च्या नावाखाली सुरू असलेल्या कोट्यवधींच्या लुटीचा अखेर विधानसभेत स्फोट झाला असून, या घोटाळ्याने संपूर्ण प्रशासनाची पोलखोल केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे एका जिवंत कंत्राटदाराच्या नावावर तब्बल दहा वर्षे व्यवहार चालवून कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिल्याने उरण नगरपालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

​आमदार सचिन आहेर यांनी विधानसभेत या प्रकरणावर थेट हल्ला चढवत चौकशीची मागणी केली. नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी व्हिडिओद्वारे हा प्रकार उघड केल्यानंतर, “श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल” येथील ठेक्यांमध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. एका त्रयस्थ व्यक्तीच्या नावाने, त्याला कोणतीही कल्पना न देता २०१३ पासून कोट्यवधी रुपयांचे भाडे थकीत ठेवून हा संपूर्ण खेळ रचण्यात आला होता. या संदर्भात नगराध्यक्षा भावना घाणेकर, माजी आमदार मनोहरशेठ भोईर आणि माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांनी आमदार सचिन आहेर यांची भेट घेऊन मुख्याधिकारी समीर जाधव यांच्या मनमानी कारभाराची माहिती दिल्यानंतरच हा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला.

​विधानसभेत बोलताना आमदार आहेर यांनी मुख्याधिकारी यांच्या कारभारावर जोरदार टीका करत, महिला नगराध्यक्षा भावना घाणेकर यांचा मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला. दरम्यान, मुख्याधिकारी समीर जाधव यांच्याविरोधात जनतेत प्रचंड संताप उसळला आहे. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांशी आरेरावीची भाषा वापरत “नगरपालिका माझीच” अशा थाटात कारभार चालविल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहेत. पदोन्नती मिळूनही गेल्या एक-दोन वर्षांपासून उरण नगरपालिकेतच ठाण मांडून बसत भ्रष्ट कारभार केल्याचा दावा जनतेकडून केला जात आहे.

​चौकशीचे आदेश मिळताच संबंधित अधिकारी व ठेकेदारांची मोठी धावपळ सुरू झाली असून, काहींनी तातडीने थकीत रक्कम भरण्याची घाई केल्याची माहिती पुढे येत आहे. तर दुसरीकडे, या प्रकरणाची चाहूल लागताच मुख्याधिकारी जाधव रजेवर गेल्याची चर्चा रंगली आहे. उरण नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच असा मोठा भ्रष्टाचार विधानसभेत गाजल्याने हा घोटाळा किती खोलवर आहे, याबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे. आता या चौकशीतून कोट्यवधींच्या या लुटीचे खरे स्वरूप समोर येते की पुन्हा एकदा हे प्रकरण फाईलमध्येच दाबले जाते, याकडे संतप्त उरणकरांचे डोळे लागले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!