• Fri. Mar 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चिल्लर कारणावरून मोठा राडा! लोणावळ्यातील पेट्रोल पंपावर तोडफोड, पेण कोळीवाड्यातील ७ तरुण-तरुणींसह इतर ४ अज्ञातांवर गुन्हे दाखल

ByEditor

Mar 27, 2026

लोणावळा: पर्यटननगरी लोणावळ्यात केवळ ‘एक रुपया’ परत देण्याच्या क्षुल्लक कारणावरून ग्राहकांनी पेट्रोल पंपावर मोठा राडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतप्त जमावाने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली असून, पंपाच्या ऑफिसची तोडफोड करून मोठे आर्थिक नुकसान केले आहे. ही घटना गुरुवारी (२६ मार्च) दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान शहरातील एलआयसी बिल्डिंग शेजारी असलेल्या देवेंद्र ऑटोलाईन भारत पेट्रोल पंपावर घडली.

याप्रकरणी पेट्रोल पंप कर्मचारी नरेश बाळू गायकवाड (वय ३३, रा. कार्ला) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी गायकवाड आणि त्यांचे सहकारी उमेश महाप्रसाद मिश्रा (वय ४३) हे ड्युटीवर होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास काही ग्राहक तिथे आले असता, केवळ एक रुपया परत देण्याच्या कारणावरून त्यांचा कर्मचाऱ्यांशी वाद झाला. हा वाद त्यावेळेस मिटला असे वाटत असतानाच, साधारण अर्ध्या तासाने आरोपींनी बेकायदेशीररित्या मोठा जमाव जमवून पुन्हा पेट्रोल पंपावर प्रवेश केला.

जमावाने गायकवाड आणि मिश्रा यांना शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी सोबत आणलेल्या लोखंडी रॉडने हल्ला करून दोघांनाही गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता या संतप्त जमावाने पेट्रोल पंपाच्या ऑफिसच्या काचा फोडून मालमत्तेचे नुकसान केले. या हिंसक प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी पेण कोळीवाडा (जि. रायगड) येथील अनंत विठ्ठल कोळी (वय ३५), प्रसाद संभाजी कोळी (वय ४०), हर्ष रवींद्र मेहेर (वय १४), राज मच्छिंद्र कोळी (वय १७), मच्छिंद्र विठ्ठल कोळी (वय ४५), वेदिका वसंत कोळी (वय २३), विनंती प्रवीण मोकल (वय २१) आणि इतर ४ ते ५ अज्ञात व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खोपडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!