• Fri. Apr 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोकणवासीयांना दिलासा! उन्हाळी सुट्ट्यांसाठी चिपळूण-दिवा मार्गावर धावणार ‘स्पेशल मेमू’

ByEditor

Apr 24, 2026

मुंबई: उन्हाळी सुट्ट्यांमुळे सध्या कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई-कोकण मार्गावरील हा वाढता ताण लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी चिपळूण ते दिवा दरम्यान विशेष मेमू (MEMU) ट्रेन चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

गाड्यांचे वेळापत्रक आणि कालावधी

1 मे ते 7 जूनदरम्यान ही विशेष मेमू ट्रेन धावणार आहे. दिवा ते चिपळूण अनारक्षित मेमू ट्रेन आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. ही मेमू लोकल आठ डब्ब्यांची असून वीकेंडदरम्यान तीन दिवस धावणार आहे. त्यामुळे महिन्याभरात दिवा ते चिपळूण 18 आणि परतीच्या मार्गावर चिपळूण ते दिवा 18 अशा एकूण 36 फेऱ्या होतील. परंतु, ही ट्रेन केवळ आठ डब्ब्यांची असून त्यात आठवड्यातून फक्त तीन दिवस धावणार असल्यामुळे प्रवाशांना कितपत फायदा होईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आरक्षणाची कटकट संपली!

या विशेष मेमू गाड्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या गाड्या अनारक्षित (Unreserved) असतील. त्यामुळे प्रवाशांना अनेक दिवस आधी तिकीट आरक्षित करण्याची गरज भासणार नाही. अचानक प्रवासाचा बेत आखणाऱ्यांसाठी, तसेच छोटे व्यापारी आणि विद्यार्थ्यांसाठी ही सेवा अत्यंत सोयीची ठरेल.

प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर

गावाकडे जाणाऱ्यांची वाढती संख्या आणि रेल्वे तिकिटांचा तुटवडा या पार्श्वभूमीवर या विशेष गाड्या प्रवाशांसाठी मोठा आधार ठरणार आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून आगामी काळात आणखी काही फेऱ्या वाढवण्याचे संकेतही रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. या निर्णयामुळे कोकणचा प्रवास आता अधिक सोपा आणि आरामदायी होणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!