• Mon. Apr 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-पुणे प्रवास सुसाट! १ मे पासून ‘मिसिंग लिंक’ खुला होणार; खंडाळा घाटातील वाहतूक कोंडीतून मिळणार सुटका

ByEditor

Apr 20, 2026

लोणावळा/मुंबई (प्रतिनिधी): मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (एक्स्प्रेस वे) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी आणि वळणावळणाच्या रस्त्यांवरून होणारी वेळखाऊ सुटका आता कायमची होणार आहे. बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प येत्या १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासातील वेळ तब्बल ३० मिनिटांनी कमी होणार आहे.

जगातील सर्वात रुंद बोगदा: गिनीज बुकमध्ये नोंद होणार?

या प्रकल्पाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे २३.५ मीटर रुंदीचा बोगदा, जो जगातील सर्वात रुंद बोगदा असल्याचे मानले जात आहे. या विक्रमाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) प्रयत्न सुरू आहेत. १३.३ किमी लांबीच्या या नवीन मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात असून सध्या ‘लोड टेस्टिंग’ची प्रक्रिया सुरू आहे.

असा असेल आधुनिक प्रवासाचा अनुभव

  • केबल स्टेड ब्रिज: पहिल्या बोगद्यानंतर ६५० मीटर लांबीचा ‘एक्स्ट्रा डोस्ड केबल स्टेट ब्रिज’ असणार आहे. जमिनीपासून १०० मीटर उंचीवर असलेल्या या पुलाचा मधला भाग ३०५ मीटर लांबीचा असून १७० मीटरचे भव्य पिलर्स उभे करण्यात आले आहेत.
  • आठ पदरी मार्ग: १३.४ किमीचा हा सरळ मार्ग आठ पदरी (8 Lane) असल्याने वाहनांची वर्दळ सुरळीत होणार आहे.
  • पावसाळी निसर्गसौंदर्य: लोणावळ्याच्या खालून जाणारे हे बोगदे आणि टायगर व्हॅली ब्रिज प्रवाशांना पावसाळ्यात निसर्गाचे विलोभनीय दर्शन घडवतील.

सुरुवातीला केवळ हलक्या वाहनांना प्रवेश

सुरक्षेच्या कारणास्तव आणि वाहतुकीचा अंदाज घेण्यासाठी सुरुवातीचे तीन महिने या मार्गावरून केवळ हलक्या वाहनांना (कार, जीप इ.) प्रवासाची मुभा असेल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अवजड आणि प्रवासी वाहनांना परवानगी दिली जाईल.

टोल दरात कोणतीही वाढ नाही

मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर टोलचे दर वाढणार का? अशी धास्ती वाहनधारकांमध्ये होती. मात्र, प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, टोल दरात सध्या कोणतीही अतिरिक्त वाढ केली जाणार नाही. सध्या कारसाठी असलेला ३२० रुपये टोल कायम राहील.

प्रवासाचा नवा मार्ग:

  • मुंबईहून पुण्याकडे: कळंबोली → एक्स्प्रेस वे → खालापूर टोल → खोपोली एक्झिट → मिसिंग लिंक (बोगदे + पूल) → कुसगाव → पुणे.
  • अटल सेतू मार्गे: नवी मुंबईतील रहिवासी एमटीएचएल (MTHL) मार्गे थेट खालापूर जवळून मिसिंग लिंकला जोडू शकतील.

नुकत्याच झालेल्या ३२ ते ३६ तासांच्या विक्रमी वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर, हा प्रकल्प मुंबईकर आणि पुणेकरांसाठी खऱ्या अर्थाने ‘वरदान’ ठरणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!