• Tue. May 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

एपीएमसीत एसीबीचा मोठा दणका; १.४० लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहाथ जाळ्यात

ByEditor

May 19, 2026

नवी मुंबई | अमुलकुमार जैन
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक मोठी कारवाई केली आहे. एका ठेकेदाराकडून १ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना स्वच्छता अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले असून, या प्रकरणात सामील असलेल्या उपसचिवांसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे एपीएमसी परिसरात आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

​या प्रकरणात अतिरिक्त पदभार उपसचिव तथा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक शरद आवटे आणि अतिरिक्त पदभार स्वच्छता अधिकारी समीर नारायण म्हात्रे यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एपीएमसी बाजार समितीमध्ये ठेकेदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांना ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत बाजार समितीमधील चोकअप काढणे आणि वार्षिक देखभालीच्या कामाचा ठेका मंजूर झाला होता. या कामाची रीतसर वर्क ऑर्डर देखील काढण्यात आली होती. मात्र, केलेल्या कामाच्या बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी डॉ. दिपक आवटे आणि समीर म्हात्रे यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती.

​तक्रारदार ठेकेदाराच्या मंजूर कामाच्या एका वर्षाच्या बिलाची एकूण रक्कम ११ लाख ९२ हजार ७१६ रुपये इतकी होती. या बिलातून जीएसटीची रक्कम वजा करून उर्वरित ९ लाख ७८ हजार २७ रुपयांवर १५ टक्क्यांनुसार सुमारे १ लाख ४६ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. अखेर तडजोडीअंती ही लाचेची रक्कम १ लाख ४० हजार रुपये निश्चित करण्यात आली. लाच देण्याची इच्छा नसल्याने ठेकेदाराने १५ मे रोजी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) या संदर्भात लेखी तक्रार दाखल केली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!