• Wed. May 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

देवगिरीवरील बैठक वादळी; तटकरे-भुजबळांमध्ये जोरदार जुंपली, तटकरेंनी थेट नेतृत्वालाच विचारला जाब!

ByEditor

May 27, 2026

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसची मंगळवारी ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी पार पडलेली बैठक अत्यंत वादळी ठरली. गेल्या काही दिवसांपासून पक्षात ‘साईडलाईन’ झाल्याची भावना असलेल्या सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याभोवतीच ही संपूर्ण बैठक केंद्रित राहिली. या बैठकीला प्रफुल पटेल यांनी मुंबईत असूनही दांडी मारली, तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बैठकीत घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांची ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याशी जोरदार जुंपल्याची माहिती समोर येत आहे.

‘आम्हीच टीकेचे धनी का?’ तटकरेंचा सुनेत्रा पवारांसमोर संताप

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण होऊ देणे आणि पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तटकरे व पटेल यांच्यावर सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी कालच्या बैठकीत आपल्या मनातील सगळी खदखद सुनेत्रा पवार यांच्यासमोर उघडपणे बोलून दाखवली.

“अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवारांच्या हातात देणे आणि पक्ष एकसंध ठेवण्यात मी आणि प्रफुल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत आमच्या दोघांवर चौफेर टीका होत असताना पक्षाचा एकही आमदार किंवा नेता आमच्या बचावासाठी पुढे आला नाही,” अशा अत्यंत कठोर शब्दांत तटकरेंनी आपली नाराजी व्यक्त केली. विलीनीकरणाच्या मुद्द्यावरूनही केवळ आपल्यालाच तोफेच्या तोंडी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

छगन भुजबळांनी रोखण्याचा केला प्रयत्न, पण…

“केवळ प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनीच नेहमी टीकेचे धनी का व्हायचे? वरिष्ठ नेतृत्व याबाबत काही भूमिका घेणार आहे की नाही?” असा थेट सवाल तटकरे यांनी पक्षनेतृत्वाला विचारला. तटकरेंनी थेट नेतृत्वालाच जाब विचारल्याने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. “जे झालं ते झालं, आता त्यावर अधिक चर्चा न करता पुढे जाण्याची गरज आहे,” असा सल्ला भुजबळांनी दिला. मात्र, तटकरे यांनी भुजबळांचे न ऐकता, “मी यावर बोलणारच आणि याबाबत आता पक्षात स्पष्टता यायला हवी,” असे ठणकावून सांगितले.

पार्थ पवारांची तडकाफडकी एक्झिट; आमदारांमध्ये शांतता

या हायव्होल्टेज ड्रामामुळे बैठकीत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. विशेष म्हणजे, सुनील तटकरे ज्यावेळी आपली बाजू मांडण्यासाठी उभे राहिले, त्याच्या काही वेळ आधीच पार्थ पवार हे बैठकीतून तडकाफडकी निघून गेले. तटकरे यांनी आक्रमक भूमिका मांडल्यानंतर बैठकीत उपस्थित असलेल्या एकाही आमदाराने पुढे बोलण्याचे धाडस दाखवले नाही आणि अखेर तणावपूर्ण वातावरणातच ही बैठक संपली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!