नवी दिल्लीः घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांनी स्वस्त होणार असल्याची माहिती येत आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सबसिडी स्वरुपात ही सूट मिळेल.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. देशात विरोधकांनी एकत्रित येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. ही आघाडी एकजुटीने मोदी सरकारला निवडणुकीत तोंड देणार आहे. विरोधक महागाईच्या मुद्द्यावरुन सरकारला जाब विचारणार आहेत. त्यातच केंद्र सरकार घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती दोनशे रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारी आहे.
देशभरात घरगुती गॅसची किंमत
सध्या राजधानी दिल्लीत १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत १,१०३ रुपये आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत १४ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत १०५२.५० रुपये, चेन्नईत १०६८.५० रुपये आणि कोलकात्यात १०७९ रुपये आहे. दुसरीकडे, १ ऑगस्ट रोजी १९.२ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत बदल होऊन त्याची किंमत १०० रुपयांनी कमी करण्यात आली होती. तर तेल विपणन कंपन्यांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीला प्रति सिलिंडर ५० रुपयांची वाढ केली असताना मे महिन्यात कंपन्यांनी दोनदा किंमतीत वाढ नोंदवली गेली होती.
सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकार ही पावले उचलणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये निवडणुकीची तयारी सुरू असल्याने सरकारकडून पाऊल उचलले जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
LPG स्वस्त गॅस सिलिंडर कोणाला मिळणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उज्ज्वला योजनेअंतर्गत घरगुती गॅस सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून तीन वाजता त्याची औपचारिक घोषणा होऊ शकते. गेल्या तीन वर्षांत देशात एलपीजी सिलिंडरच्या किमती दुपटीने वाढल्या असताना अनेक दिवसांपासून लोक घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत दिलासा मिळण्याची वाट पाहत आहेत.