१२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नवी यादी जाहीर, ३ जिल्ह्यांचा तिढा कायम
पुणे : राज्य शासनाने नव्याने पालक मंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. यात पुण्याच्या पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांना हटवून आता ही धुरा अजित पावर यांना दिली आहे. पुण्याचे पालकमंत्री नेमके कोण? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. उपमुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यापासून अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असल्याचे भासवत होते. यामुळे भाजपचे चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. मात्र, आता राज्य शासनाने राज्यातील १२ पालकमंत्र्यांची सुधारित यादी प्रसिद्ध केली असून अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्रीपद दिल्याने पुण्यावर अजित पवार यांचे वर्चस्व कायम असल्याचे सिद्ध झाले आहे.
राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. या सोबतच अकोला, सोलापूर, अमरावती, भंडारा, कोल्हापूर, गोंदिया, बीड या जिल्ह्यांचे देखील पालक मंत्री बदलण्यात आले आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून पवार हे पुण्यात सक्रिय झाले होते. पुण्यात बैठकांचा धडाका घेत त्यांनी प्रशासनावर त्यांचा वचक असल्याचे दाखवून दिले होते. एवढेच नाही तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या कोट्यवधी कामांच्या यादीला मंजूरी देऊनही निधी वाटप होऊ शकला नव्हता. दरम्यान, यामुळे चंद्रकांत पाटील यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. या बाबत त्यांनी थेट पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार शिंदे यांच्या कडे केली होती. दरम्यान, पुणे प्रशासनाची देखील कोंडी झाली होती. नेमके आदेश कुणाचे मानायचे याचा प्रश्न त्यांना पडला होता. दरम्यान या बाबत निर्णय होत नसल्याने अजित पवार हे नाराज असल्याच्या देखील चर्चा होत्या. काल दिल्ली येथे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच गेल्याने पवार यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा नव्याने पालक मंत्री पदांची यादी जाहीर केली असून यात अजित पवार यांना पुण्याचे पालक मंत्री पद बहाल केले आहे. तर चंद्रकांत पाटील यांना सोलापूरचे पालकमंत्री पद बहाल केले आहे.
नव्या यादीनुसार पुण्यात अजित पवार, अकोलाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, सोलापूरचे चंद्रकांत दादा पाटील, अमरावतीचे चंद्रकांत दादा पाटील, भंडारा विजयकुमार गावित, बुलढाण्याचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील, कोल्हापूरचे हसन मुश्रीफ, गोंदियाचे पालकमंत्रीपदी धर्मरावबाबा आत्राम आणि बीडच्या पालकमंत्री पदी धनंजय मुंडे, परभणीच्या पालकमंत्री पदी संजय बनसोडे, नंदूरबारच्या पालकमंत्री पदी अनिल भा. पाटील आणि वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली आहे. त्याचवेळी नाशिक, सातारा आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाविषयीचा तिढा अद्याप कायम आहे.