मिलिंद माने
मुंबई : मंत्रालयात शासकीय कामासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नागरिकांना मंत्रालयात सरसकट प्रवेशावर निर्बंध घालून ज्याप्रमाणे बदल केला आहे त्याच धर्तीवर मंत्रालयात काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या वाहनांच्या प्रवेशावर देखील गृह विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रवेशावर आता निर्बंध घातले आहेत.
मंत्रालयीन गृह विभागाचे कक्ष अधिकारी प्रवीण ढिकले यांनी ६ ऑक्टोबर २०२३ रोजी मंत्रालयातील सर्व खात्याच्या सचिवांना आदेश काढून सुरक्षेचे नियम जाहीर केले आहेत. राज्याचे अप्पर मुख्य सचिव गृह यांच्या अध्यक्षतेखाली ६ ऑक्टोबर २०२३ रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मंत्रालयीन विभागाच्या सर्व विभागांनी आपापल्या कार्यालयात येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाहने जी मंत्रालयात येतात त्यावरती आता निर्बंध घातले जाणार आहेत.
मंत्रालयात जे अधिकारी व कर्मचारी कामानिमित्त स्वतःच्या वाहनाने येत असतात अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वाहनांच्या (चार चाकी व दुचाकी) वाहनांचे वाहन क्रमांक, वाहनाची आरसी बुक तसेच हे वाहन कोणत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आहे त्याचे नाव, पदनाम व संपर्क क्रमांक अशी इत्यंभूत माहिती मंत्रालयीन गृह विभागाचे उपायुक्त मंत्रालय, सुरक्षा विभाग मंत्रालय व गृह विभाग कार्यालय विशेष शाखा चार यांना तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. मंत्रालयीन गृह विभागाची मंत्रालयात येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर आता विशेष पाळत राहणार तर आहेच परंतु निर्बंध येणार असल्याने अनेक अधिकारी व व कर्मचाऱ्यांनी गृह विभागाच्या या आदेशा विरोधात नाराजी व्यक्त केल्याचे खाजगीत चर्चिले जात आहे.