• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घेतला पुनाडे आठगाव जलजीवन योजनेच्या कामांचा आढावा

ByEditor

Oct 23, 2023

अनंत नारंगीकर
उरण :
तालुक्यात विविध ठिकाणी जलजीवन योजनेची कामे सूरू असून ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे ही कामे अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत पडलेली आहेत. उरण तालुक्यातील पुनाडे धरणातून या भागातील ८ गावांसाठी सुमार ९ कोटी ८९ लाख रूपयांची जलजीवन योजना राबविण्यात येत आहेत. मात्र ही कामे अर्धवट अवस्थेत असल्याने आठगाव पाणी कमिटीने या बाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तक्रारी केल्या होत्या.

त्या अनुषंगाने शनिवारी (दि. २१) पुनाडे आठगाव पाणी कमिटीची जलजीवन मिशनची सुरू असलेली कामे पाहण्यासाठी व आढावा घेण्यासाठी एमजेपी पनवेलचे मुख्य कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता आणि ठेकेदार यांनी पाणी कमिटीच्या सदस्यांची भेट घेतली. यावेळी पुनाडे आठगावच्या पाणी कमिटीच्या अध्यक्षा तथा वशेणी गावच्या सरपंच अनामिका म्हात्रे, माजी उपाध्यक्ष आठगाव पाणी कमिटी व सदस्य मुकुंद गावंड, सारडे सरपंच रोशन पाटील, पिरकोन सरपंच कलावती पाटील, माजी सरपंच व कमिटी खजिनदार के. वाय. गावंड, माजी सरपंच संदीप पाटील, सदस्य समाधान म्हात्रे, सदस्य रसिक पाटील या सर्वांनी एमजेपीच्या अधिकाऱ्यांना कामातील त्रुटी दाखवून दिल्या. काम करताना पिरकोण, पाले, आवरे, वशेणी, सारडे व इतर गावातील रस्ते खराब झाले आहेत, ते रस्ते त्वरित दुरुस्त करुन द्यावेत. तसेच पिरकोण, वशेणी मुख्य पाईपलाईनचे काम,सारडे खाड़ीतुन येणाऱ्या पाईप लाईनचे काम, योजनेतील सर्व गावातील पाईप लाईन आणि वाढीव पाईप लाईनची कामे ही सर्व लवकरात लवकर पूर्ण करावी ही आग्रही मागणी केली.

ही कामे लवकर झाली नाहीतर आमदार महेश बालदी यांच्या मार्फत याबाबत आवाज उठविण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे वरिष्ठ अभियंता पांढरपट्टे, उप अभियंता नामदेवराव जगताप यांनी पाणी कमिटीच्या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!