महादेव कोळी, डोंगर कोळी आदिवासी समाज भव्य मेळावा उत्साहात संपन्न
वार्ताहर
तळा : रायगड जिल्ह्यात आपला महादेव कोळी, डोंगर कोळी समाज संख्येने किती आहे हे पाहण्यापेक्षा संघटित किती आहे हे महत्वाचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच समाज बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी शासन स्तरावर लढण्याकरिता संघटित होणे ही काळाची गरज आहे असे आवाहन महादेव कोळी, डोंगर कोळी समाजाचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पेण पंचायत समितीचे माजी सभापती महादेव दिवेकर यांनी केले. महादेव कोळी-डोंगर कोळी समाजाचा रायगड जिल्हा मेळावा तळा तालुक्यातील कुंभळे या गावात पार पडला यावेळी ते बोलत होते.
या मेळाव्यासाठी महादेव कोळी डोंगर कोळी समाज संघटना अध्यक्ष विठोबा साबळे, आदिवासी लोककल्याण सेवाभावी संस्था पुणे संस्थापक दिलीप खामकर, प्राचार्य संतोष भारमळ, तळा पंचायत समिती माजी सभापती विजया विठोबा साबळे, रोवळा ग्रामपंचायत सरपंच हरिश्चंद्र देवकर, खजिनदार राहुल पोकेरे, सह खजिनदार दिपक साबळे, सचिव गजानन देवकर, शशिकांत घानिवले, पांडुरंग देवकर, हरिश्चंद्र देवकर, प्रकाश देवकर, गणपत मढवी, बाळा वरोते, हरिभाऊ वरोते, किसन गवारने, रोहिदास उमते, रमेश उमते, संतोष जाधव, मयूर जठार, मारुती पडवळ, किसन बालूगडे, मया भोसले, सागर पाटील, संतोष चव्हाण यांच्यासह तळा, माणगाव, रोहा, सुधागड, अलिबाग येथील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, शासना मार्फत आदिवासी विकास विभाग त्यांचे विविध योजनांची माहिती वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्यांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने पुढे यावे याचवेळी त्यांनी आदिवासी सांस्कृतिक रूढी परंपरा याची माहिती दिली त्याचप्रमाणे आदिवासी आद्य क्रांतिकारक यांची माहिती सर्व आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवली. यावेळी अध्यक्ष विठोबा साबळे, आदिवासी लोककल्याण सेवाभावी संस्था पुणे संस्थापक दिलीप खामकर, प्राचार्य संतोष भारमळ यांनी देखील मार्गदर्शन केले. जय आदिवासी, जय राघोजी, जय बिरसा या घोषणांनी येथील परिसर दुमदुमून गेला होता. सरपंच हरिश्चंद्र देवकर यांनी सर्व आदिवासी बांधव व मान्यवरांचा सन्मान करून कार्यक्रमाचे खूप सुंदर नियोजन केले होते.