मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी शिबिरामध्ये जहरी टीका करुन खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना ही उत्तमपद्धतीनं सरकार चालवू शकते आणि आम्ही ते करुन दाखवले आहे. असे म्हणत येत्या काळामध्ये आम्ही आणखी खंबीरपणे वाटचाल करणार असल्याचा निर्धार ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण हे वेगळ्या दिशेनं जात असल्याचे दिसून आले आहे. त्या एका जाहिरातीनं सगळ्यांचीची झोप उडाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेली ती जाहिरात होती. देशात नरेंद्र आणि राज्यात एकनाथ शिंदे अशा आशयाच्या त्या जाहिरातीनं अनेकांना धक्का बसला होता. त्या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नव्हता. त्यामुळे फडणवीसांना डावलण्याचा तर हा प्रयत्न नाही ना अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले.
यासगळ्यात वरळीमध्ये पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे. त्या जाहिरातीमध्ये आनंद दीघे यांचा देखील फोटो नव्हता. ही गोष्ट अनेकांनी निदर्शनास आणून दिली होती. विरोधी पक्षावर टीका करताना ठाकरे म्हणाले की, हे काही विचारांचे वारसदार नाही. ते गद्दारांच्या विचारांचे वारसदार आहेत. भाजपला जे सुखात सोबत आहेत तेवढेच हवे आहेत. उद्या मात्र तुमच्या बरोबर कोण राहणार नाही हे लक्षात ठेवा.
देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रश्न विचारला आहे तो असा की, कर्नाटक सरकारनं सावरकरांविषयीची धडा अभ्यासक्रमातून वगळला आहे. यावर उद्धव ठाकरे यांचे मत काय आहे. तर मी त्यांना सांगेल की, फडणवीस तुमची परिस्थिती खूप हालाखीची आहे. सहनही होत नाही, आणि सांगताही येत नाही. अशी परिस्थिती फडणवीसांची आहे.
कारण त्यांना वरुन आदेश आहे. देवेंद्रजी सावरकरांचा धडा वगळला याचा निषेध शिवसेना करते. पण ज्या सावरकरांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरणयातना भोगल्या त्या सावकरांच्या विचारधारेशी ज्यांचा काडीमात्र संबंध नाही त्यांना तुम्ही सहभागी करुन घेता याबद्दल तुमचे मत काय? असा प्रश्न ठाकरेंनी यावेळी विचारला. जर तुम्ही खरे सावरकरप्रेमी असाल तुमच्या वरती जे बसले आहेत जसे राऊत म्हणाले आमचा एकच बाप आहे, तर तुमचे किती हे तुम्हालाच माहिती….कारण मध्ये जाहिरात आली होती. त्यात बाप बदलला होता. नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा वेगळाच फोटो….तर तुम्ही खरे सावरकर प्रेमी असाल तर देशावर हक्क सांगणाऱ्या तुमच्या नेत्याचा धिक्कार करा. असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसते आहे. तुम्हाला तुमचा काय जोर दाखवायचा आहे की, तो मणिपूरमध्ये दाखवा. तुमची ताकद त्या राज्यामध्ये दाखवा. देशातला एक भाग पेटला आहे आणि तुम्ही अमेरिकेमध्ये जाता. याला काय अर्थ आहे का असा प्रश्न मोदींना उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
