• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचं कॅन्सरच्या आजारानं निधन; ६७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ByEditor

Dec 8, 2023

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन झाले आहे. पोटाच्या कर्करोगामुळे वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेते ज्युनियर मेहमूद यांना पोटाचा कर्करोग झाला होता. त्यांचा हा आजार चौथ्या टप्प्यात पोहोचला होता. ज्युनियर मेहमूद यांनी त्यांच्या राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण, कॅन्सरशी सुरू असलेली ही झुंज ते हरले. ज्युनियर मेहमूदने ‘हाथी मेरे साथी’, ‘कारवां’ आणि ‘मेरा नाम जोकर’सह अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले होते.

ज्युनियर मेहमूद यांचे जवळचे मित्र सलाम काझी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्युनियर मेहमूद यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान अभिनेते मेहमूद यांनी त्यांचे जुने मित्र, ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर सचिन पिळगावकर आणि जितेंद्र हे ज्युनियर मेहमूद यांना भेटायला रुग्णालयात पोहोचले होते. या भेटीदरम्यान सचिन पिळगावकर यांनी आपण काही मदत करू शकतो का, अशी विचारणाही केली होती.

गेल्या १५ वर्षांपासून सलाम काझी आणि ज्युनिअर मेहमूद यांची घट्ट मैत्री होती. ज्युनियर मेहमूद यांच्यावर आधी त्यांच्या घरीच उपचार केले जात होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या तब्येतीची माहिती देत असताना सलाम काझी म्हणाले होते की, ‘ज्युनियर मेहमूद गेल्या २ महिन्यांपासून आजारी होते. सुरुवातीला आम्हाला वाटले की, नेहमीप्रमाणे तब्येतीची कुरबुर असेल. त्यातून ते बरेसुद्धा झाले. पण, नंतर अचानक त्यांचे वजन कमी होऊ लागले आणि तेव्हाच कॅन्सरचे निदान झाले. जेव्हा ज्युनियर मेहमूद यांचा मेडिकल रिपोर्ट आला, तेव्हा त्यांना यकृत आणि फुफ्फुसात कर्करोग, आतड्यात गाठ आणि कावीळही झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण डॉक्टरांनी हा कॅन्सर चौथ्या स्टेजचा असल्याचे आधीच सांगितले होते. कॅन्सर एक महिन्यापूर्वीच कळला असला, तरी तो स्टेज फोरमध्ये होता. डॉक्टरांनी त्यांच्याकडे आता अवघे ४० दिवसांचेच आयुष्य असल्याचे म्हटले होते.’

ज्युनियर महमूद यांचे चित्रपट
ज्युनियर महमूद यांनी 60 आणि 70 च्या दशकात बड्या कलाकारांसोबत काम केले. तसेच अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम करून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केले. नौनिहाल, मोहब्बत जिंदगी है, संघर्ष, ब्रह्मचारी, फरिश्ता, हाथी पतंग, अंजाना, दो रास्ते, यादगार, आन मिलो सजना, जोहर मेहमूद ने हाँगकाँग, कारवां, हाथी मेरे साथी, छोटी बहू, चिंगारी, हरे राम गाता हरे, हरे राम गाता, चलने अनेक चित्रपट आणि काही मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!