• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंकडून पुरस्काराची घोषणा

ByEditor

Jan 30, 2024

मुंबई : ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे. अशोक सराफ यांनी आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये आणि नाटकांमध्ये अभिनय केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एक्स हँडलवरुन ही माहिती दिली आहे. अशोक सराफ यांनी विनोदी, गंभीर आणि खलनायकी भूमिकाही साकारल्या आहेत. तसंच आपल्या अभिनयातून रसिकांच्या मनावर राज्य गाजवलं आहे. अशोक सराफ हे एक लोकप्रिय अभिनेते आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी खूप गाजली होती. हम पांच या मालिकेतला त्यांचा अभिनय केला आहे. निवेदिता जोशी या त्यांच्या पत्नी आहेत.

मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला.दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेलं. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ ययाती आणि देवयानी ‘ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या. त्यांची आजवरची लक्षात राहिलेली भूमिका म्हणजे अशीही बनवा बनवी या सिनेमातली धनंजय मानेची भूमिका आहे. तसंच पांडू हवालदार या सिनेमात त्यांनी दादा कोंडकेंसह अभिनय केला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!