प्रतिनिधी
मुंबई : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकार बंधू भगिनींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 6 जानेवारी पत्रकार दिन. पत्रकार हे समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम अविरत करीत असतात. अशा या अविरतपणे काम करणाऱ्या पत्रकारांचा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रिपब्लिकन पक्ष (खोरीपा) तर्फे मुंबई आझाद मैदान येथील खोरीप कार्यालयात सन्मान करण्यात आला.

रिपब्लिकन पक्षाचे (खोरीपा) प्रदेशाध्यक्ष सुनील भाऊ निरभवणे व एकतावादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष दिलीप दादा जगताप या मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, वरिष्ठ क्राईम रिपोर्टर शिरीष वानखेडे, नवशक्तीचे वरिष्ठ पत्रकार रमेश औताडे आणि दैनिक सकाळ व नवराष्ट्रचे वरिष्ठ पत्रकार दिनेश मराठे यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी खोरीपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनीलभाऊ निरभवणे, मुंबई अध्यक्ष भागवत कांबळे, कार्याध्यक्ष सलीम खतीब, सरचिटणीस विक्रांत पाटील, वरिष्ठ आंबेडकरी चळवळीचे नेते दिलीप दादा जगताप, रिपाई (आठवले) कामगार नेते प्रकाश जाधव, ज्येष्ठ आंबेडकरी नेते रोकडे साहेब आणि पत्रकार मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.