प्रतिनिधी
नागोठणे : नागोठणे जवळील सुकेळी येथील जिंदाल कंपनीत पाईप लोडींगचे काम करीत असताना पाईप अंगावर पडल्याने त्याखाली दबून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
कौलेश बलदेव राय (वय ४६, रा. गोविंदपुर काॅलनी जिंदाल कंपनी सुकेळी, रोहा) हा जिंदाल कंपनीमध्ये ईआरडब्ल्यु डिस्पॅच सेक्शनमध्ये लोडींग हेल्पर म्हणून काम करीत होता. ३ फेब्रुवारी २०२४ रोजी कौलेश राय हा एकावर एक रचुन ठेवलेल्या पाईप रॅकमधील पाईप क्रेनच्या साहाय्याने ट्रकमध्ये ठेवण्याकरीता चढले असता रॅकमधील एक पाईप घसरून कौलेश याच्या अंगावर पडल्याने त्याचा दोन पाईपमध्ये कमरेखालील भाग दबला गेला. त्यास तात्काळ उपचाराकरीता जिंदाल हाॅस्पीटल येथे नेले असता तेथील डाॅक्टरांनी तपासुन त्यास मृत घोषीत केले. या घटनेबाबत नागोठणे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदर घटनेचा पुढील तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. बी. चव्हाण करीत आहेत.