इमारतींची परवानगी देताना नियमांची पायमल्ली
उरण नगरपालिका बांधकाम विभागातील आजी माजी अधिकारी वर्गानी दिलेल्या बांधकाम परवानगीमध्ये मोठ्या प्रमाणात नियमांची पायमल्ली करून परवानगी दिल्या असल्याचे उघड होत आहे. तरी या सर्व परवानगीची व आजी माजी अधिकारी वर्गाच्या मालमत्तेची सखोल चौकशी केली तर नक्कीच महाघोटाळा उघड होईल. |
घनःश्याम कडू
उरण : उरण नगरपालिका हद्दीत विकासकाकडून पुनर्विकासाच्या नावाखाली मोठमोठे टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी विकासकांना नगरपालिका बांधकाम विभागाने परवानगी देताना कागदपत्रांची कोणतीही खातरजमा न करता नियमांचे उल्लंघन करून आपला आर्थिक हित साधत विकासकांना परवानगी देऊन मोकळे झाले आहेत. याबाबत काहींनी तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. एका इमारतीला परवानगी देताना खोटी पॉवर ऑफ अटर्नी जोडून परवानगी घेतली असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. याबाबत लवकरच परवानगी देणार्या अधिकार्यांवर गुन्हे दाखल होणार असल्याचे समजते.
ज्यावेळी टॉवरचे बांधकाम करताना किमान 15 ते 20 फुटांपर्यंत खोदकाम करण गरजेच असत त्यानंतर किमान 2 फुटापर्यंत फुटिंग करीता पीसीसी म्हणजे काँक्रेटिंग करणं आवश्यक आहे. त्यानंतर बीम उभे करणे या गोष्टी सुरक्षेचा दुष्टीने आवश्यक आहे. या सर्व गोष्टींचा विचार न करता तसेच नगरपालिकेचा गटारं विकासक पत्रे लावून आत घेऊन ते बंद केले आहेत. यामध्ये नगरपालिका अधिकारी आणि विकासक यांच्यामध्ये देवाणघेवाण झाली असल्याची चर्चा आहे. विकासकांनी रेरा सर्टिफिकेट मिळवण्यासाठी नगरपालिका अधिकारी यांना चिरीमिरी देऊन बोगस कागदपत्रे त्यामध्ये व्यक्ती मयत असतानाही ते जिवंत असल्याचे दाखवून बोगस पॉवर ऑफ अटनीर्र् दाखवली असल्याचे बिंग थोड्या दिवसात बाहेर येणार आहे.
आता सुरू असलेली खोदकाम खरं तर जानेवारी महिन्यात करायला हवी होती. पावसाळा तोंडावर असताना घाईघाईत कामं करण्यात येत आहेत. पावसाळ्यात काँक्रीटीकरण करताना रेती, ग्रीट आणि सिमेंट यांचा वापर करावा लागत असतो. यातील सिमेंट पावसाच्या पाण्यात वाहून जाण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे या इमारती उभ्या रहात असताना किती प्रमाणात मजबूत होतील हा संशोधनाचा विषय बनला आहे.
उरण हे भुकंप प्रवरण क्षेत्रात मोडत असल्याने या इमारतींना भुकंपाचे प्रमाणात घेणं गरजेचं आहे. या सर्व बांधकामांवर देखरेख ठेवण्यासाठी नगरपालिकेची स्थापत्य अभियंत्यांची टीम असणं आवश्यक आहे. परंतु, नगरपालिकेचे अधिकारी कधी भेट देताना दिसत नाहीत. ते आपले आर्थिक हित साधत आहेत. भविष्यात मुंब्रा, महाड व इतर ठिकाणच्या घडलेल्या दुर्घटनांची पुनरावृत्ती अशा निकृष्ट दर्जाच्या बाधकामांमुळे उरणमध्ये घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल यानिमित्ताने उभा रहात आहे.
उरण नगरपालिका बांधकाम विभागातील एक अधिकारी नुकताच सेवानिवृत्त झाला आहे. त्याचा मोठ्या थाटामाटात निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला होता. मात्र, त्यावेळी आणखीन एक इमानदारीने काम करणारा सफाई कामगार सेवानिवृत्त झाला असताना त्यांचा निरोप समारंभ नगरपालिका प्रशासन करू शकले नाही. असा दुजाभाव नगरपालिका अधिकारी वर्गाकडून केला जात असल्याने कर्मचारी वर्गात नाराजीचा सूर निघत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका न झाल्याने सध्या कारभार प्रशासकाच्या हातात आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या पदाधिकारी यांचा हस्तक्षेप होत नाही. परंतु, तरीही काही सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक हे अधिकारी वर्गाच्या संगनमताने नियमांची पायमल्ली करून आर्थिक हित साधत परवानगी देत सुटले आहेत. नुकताच सेवानिवृत्त झालेल्या बांधकाम विभागातील अधिकारी यांनी अनेक विकासकांना कागदपत्रांची शहानिशा न करता परवानगी दिली असल्याचे समजते. यापूर्वी सुद्धा बांधकाम विभागातील अनेक अधिकारी येऊन बदलून किंवा सेवानिवृत्त झाले आहेत. या सर्व अधिकार वर्गाच्या कारभाराची आणि त्यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी केली तर नक्कीच अब्जावधी रुपयांचा घोटाळा उघड होईल अशी चर्चा उरणच्या नाक्यानाक्यावर दबक्या आवाजात सुरू आहे.