• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

न्हावा शेवा येथे ५.७ कोटी रुपयांची सुपारी जप्त

ByEditor

Jun 13, 2024

जगातील सर्वात मोठ्या सुपारी उत्पादक भारतात होतेय सुपारीचे स्मगलिंग

घन:श्याम कडू
उरण :
न्हावा शेवा येथे असलेल्या जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊसमध्ये डांबराच्या नावाखाली आयात करण्यात आलेली ११२ मेट्रिक टन सुपारी एसआयआयबी अर्थात विशेष गुप्तचर आणि तपास शाखेच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. या सुपारीची किंमत सुमारे ५.७ कोटी रुपये आहे. या प्रकरणात ६.२७ कोटी रुपयांची करचुकवेगिरी करण्यात आली आहे.

यापूर्वीही बंदरातून अनेक प्रकारची तस्करी होत असल्याचे उघड होऊनही आजतागायत वेगवेगळ्या मालाची तस्करी होत असल्याचे समोर येत आहे. तस्करी जर उघड होत असली तरी काहीवेळा अधिकारी वर्गाच्या संगनमताने मालाची तस्करी झाली असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. १० कंटेनरमधून ही ११२.१४ मेट्रिक टन सुपारी आणण्यात आली होती. आयाती संबंधित कागदपत्रात या कंटेनरमधील पिंपात बिटुमेन अर्थात डांबर असल्याचे म्हटले होते. वास्तविक भारत हा जगातील सर्वात मोठा सुपारी उत्पादक देश आहे. परंतु देशातील अवैध गुटखा उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात सुपारीची तस्करी केली जाते.

या प्रकरणात आयात करण्यात आलेल्या कंटेनर्समध्ये ड्रम्स होते. त्यात डांबर असल्याचे भासविण्यात आले होते. विदेशी पुरवठादाराने यासाठी संपूर्ण नियोजन आणि अंमलबजावणी केल्याचे यावरून दिसून येते. हे सुसंघटित आंतरराष्ट्रीय तस्करी जाळ्याचे द्योतक आहे. त्याचा छडा लावण्यासाठी एसआयआयबीच्या (आयात) पथकाने अथक परिश्रम घेतले. जवाहरलाल नेहरू बंदर, न्हावा शेवा येथे तस्करीला आळा घालण्यासाठी हे पथक कार्यरत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!