क्रीडा प्रतिनिधी
रायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्यावतीने ऑगस्ट महिन्यात १५ वर्षाखालील मुलींची आंतरजिल्हा निमंत्रित निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार आहे. ह्या स्पर्धेत रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा संघ देखील सहभागी होणार आहे. स्पर्धेच्या पूर्वतयारीकरिता रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने रविवार, दि. २१ जुलै रोजी कामोठे पनवेल येथील रोशन क्रिकेट इनडोअर अकॅडमीमध्ये सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील एकूण ३६ मुलींनी सराव शिबिरात सहभाग घेतला.
ह्या शिबिरामध्ये रायगड जिल्ह्यातील उरणचे नावाजलेले प्रशिक्षक नयन कट्टा यांनी उपस्थित मुलींना फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण याचे उत्तम प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले. रायगड जिल्ह्यात मुलांच्या बरोबरीने मुलींचा देखील लेदरबॉल क्रिकेटकडे ओढा वाढत चालला आहे. पंधरा वर्षाखालील वयोगटात जिल्ह्यातील विविध क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या मुलींची संख्या वाढत असल्याचं ह्या शिबिरा दरम्यान दिसून आले. सदरच्या शिबिरासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य राजेश पाटील, प्रदिप खलाटे, विनय पाटील, देवदत्त शास्त्री उपस्थित होते. शंकर दळवी यांनी शिबीराचे उत्तम नियोजन केले. एमसीएच्या स्पर्धेत सहभागी होण्याआधी मुलींचा सराव व्हावा यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन प्रयत्नशील आहे. त्यासाठी आणखी दोन-तीन दिवस सराव शिबिराचे आयोजन करून अंतिम संघ निवडला जाईल अशी माहिती आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदिप नाईक यांनी दिली.