मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी उद्या महत्त्वाच्या हालचाली होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे. तसेच उद्या सकाळी 11 वाजता उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी उद्या सकाळी दहा वाजता महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर अकरा वाजता शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार असलयाची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्या शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 मंत्री असा एकूण 10 मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. शिवसेनेकडून मंत्रीपदासाठी आमदार भरत गोगावले, अनिल बाबर, योगेश कदम यांची नावे निश्चित झाली आहेत. तर चौथ्या मंत्रीपदासाठी संजय शिरसाट आणि संजय रायमूलकर यांच्यात पेच निर्माण झाला आहे. तो पेच आज रात्रभरात सोडवला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप यांच्यात तिढा असल्याची माहिती समोर आली होती. हा तिढा सोडवण्यासाठी अजित पवार आज दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेल्याची चर्चा होती. पण प्रफुल्ल पटेल यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप याबाबत कोणताही तिढा नसल्याचं स्पष्ट केलं होतं. राजशिष्टाचार म्हणून मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे अमित शाह यांच्या औपचारिक भेटीसाठी दिल्लीत आल्याची माहिती त्यांनी दिली होती.