डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू; नातेवाईकांचा आरोप
मिलिंद माने
महाड : तालुक्यामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अनेकवेळा रूग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार सुरू असताना रूग्ण मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील काही महिन्यापूर्वी डॉक्टर नांदगावकर यांच्या रुग्णालयात एका लहान मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज महाड तालुक्यातील बिरवाडी येथील मधले आवाड मधील विवाहित महिला विरा वितेश मोरे या महिलेचा महाडमधील डॉक्टर महामुणकर रुग्णालयात मृत्यू झाला असून या मृत्यूस डॉक्टर म्हामुणकर कारणीभूत असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.
वीरा मोरे ही विवाहित आपल्या आईच्या घरी आली असताना सकाळी घरात अचानक चक्कर आल्याने बिरवाडी येथे प्राथमिक उपचार करून महाड येथील प्रसिद्ध डॉ. महामुणकर यांच्या आदित्य नर्सिंग होम येथे अधिक उपचाराकरिता वीरा हिस दाखल करण्यात आले होते. विरा मोरे या महिलेला छातीत दुखत असल्यामुळे श्वसनाचा त्रास व्हायला सुरुवात झाली असता वीरा मोरे हिच्यावर डॉक्टर महामुणकर या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना उपचारादरम्यान डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे सदरच्या महिलेचा मृत्यू झाला असे घटनास्थळी असलेले नातेवाईक यांनी आरोप केले आहेत. तर मृत व्यक्तीचे नातेवाईक आणि डॉ. महामुणकर यांच्यांत शाब्दिक चकमक देखील झाली. माझ्या बहिणीला डॉक्टर महामुणकर यांनीच मारले असे आरोप नातेवाईक करीत असल्याचे पहायला मिळाले.
वीरा मोरे यांच्या नातेवाईकांचा उद्रेक पाहिल्याने घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी नातेवाईकांना शांत केले व पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृत वीरा मोरे यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले असता सदरचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदना करीता पाठविण्यात आला असून महाड पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यूची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. सदरचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असून संबंधित खाजगी हॉस्पिटलवर कारवाई व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे सदर घटनेचा अधिक तपास करीत आहेत.