• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

येत्या दोन दिवसांत मारेकऱ्यांना पोलीस अटक करतील -भाजपा नेत्या चित्रा वाघ

ByEditor

Jul 28, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
शनिवारी उरणच्या यशश्रीचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्यानंतर, यशश्रीच्या मारेकऱ्यांना पकडून न्याय मिळावा यासाठी उरण बाजारपेठ बंद करून जनआक्रोश पहायला मिळाला आहे. या घटनेचा मी एक महिला म्हणून जाहीर शब्दात निषेध व्यक्त करत असून शिंदे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. तसेच पोलीस यंत्रणा आरोपीला दोन दिवसांच्या आत अटक करतील असा विश्वास संतप्त उरणवासियांना भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिला आहे.

यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृणपणे हत्या दाऊद शेख या मुस्लिम इसमाने सुडबुद्धीने केली आहे. त्यामुळे निष्पाप यशश्री शिंदे या तरुणीला न्याय मिळावा यासाठी उरण परिसरातील महिला आक्रमक झाल्या होत्या. यावेळी महिलांनी काहीकाळ अंत्ययात्रा देखील रोखून धरली होती. गुरुवार, दि. २५ जुलै रोजी उरणमधील २२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली. याची तक्रार शुक्रवारी पोलीस ठाण्यात देण्यात आली. शनिवारी सकाळी बेपत्ता यशश्री शिंदे हिचा मृतदेह सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. उरण, कोटनाका येथील ‘सगीर ब्रदर्स’ या पेट्रोल पंपामागे शनिवारी प्रात:विधी करण्यासाठी गेलेल्या इसमाला झूडूपातील मृतदेह दिसला आणि प्रकार उघडकीस आला. यशश्रीच्या मृतादेहावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. तर तिच्या गुप्तभागांवर देखील अशा खुणा आढळून आल्या आहेत. म्हणजेच यशश्रीचा विकृत बुद्धीकडून खून करण्यात आला होता हे उघड होते. यानंतर यशश्रीचा मृतदेह येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालायात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. आलोट गर्दी यशश्रीवर झालेल्या क्रूर कृत्यमागील आरोपीला अटक करून यशश्रीला न्याय मिळावा यासाठी जमा झाली होती. आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असे सर्वांचे मत होते. मात्र यशश्रीच्या कुटुंबाने तिच्या छिन्नविच्छिन्न मृतादेहाची अधिक विटंबना होऊ नये यासाठी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी महिला आक्रमक होऊन एकच आक्रोश करत होत्या. यशश्रीला न्याय मिळालाच पाहिजे…..यावेळी महिलांनी न्यायासाठी रस्त्यावर बसून यशश्रीची अंत्ययात्रा रोखून धरली. मात्र यशश्रीच्या कुटुंबाच्या विनवणीनंतर यशश्रीचा अंतिम प्रवास सुरु झाला आणि २२ वर्षीय यशश्री अनंतात विलीन झाली.

मात्र कर्नाटक राज्यात पळून गेलेला दाऊद शेख या मारेकऱ्याला अटक करण्यात पोलीस यंत्रणेला यश येत नसल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, उरणकरांनी रविवारी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने करीत आपला आक्रोश व्यक्त केला. यशश्री शिंदे या तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि उरणच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उरण पोलीस ठाण्यात येऊन पोलीस आयुक्त तसेच इतर पोलीस अधिकारी वर्गाची भेट घेऊन आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. यावेळी उरणचे आमदार महेश बालदी तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यशश्री शिंदे हिच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करण्यात येणार आहे. तसेच शिंदे कुटुंबियांच्या मागे पोलीस यंत्रणा उभी राहणार आहे. तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन विवेक पानसरे, पोलीस उप आयुक्त यांनी केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!