एकच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
पालक व्यवस्थापन समितीतर्फे शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी
अनंत नारंगीकर
उरण : रायगड जिल्हा परिषदेच्या पुनाडे प्राथमिक शाळेत एका शिक्षकाला पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग शिकवावे लागत आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालक व्यवस्थापन समितीतर्फे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, शिक्षक मिळत नसल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या पुनाडे प्राथमिक शाळेत पाचवी पर्यंतचे वर्ग सुरु आहेत. जवळपास चाळीस विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. पाचवीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक शिकवण्याचे काम करीत होते. मात्र या दोन शिक्षकांपैकी एका शिक्षिकेची बदली करण्यात आली. जुलैमध्ये बदली होऊनही पुनाडे प्राथमिक शाळेत शिक्षक देण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे अतोनात नुकसान होत आहे. या संदर्भात पंचायत समिती शिक्षण विभागाकडे शिक्षक मिळणे संदर्भात मागणीही करण्यात आली आहे. मात्र तरीही शिक्षकांची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आणखी नुकसान होणार आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी गटशिक्षण अधिकारी प्रियंका पाटील यांनी याबाबतीत लक्ष घालून एका शिक्षकांची नेमणूक त्वरित करावी अशी मागणी पुनाडे माजी सरपंच देविदास पाटील यांनी केली आहे.
आम्ही शिक्षण विभागाकडून एक शिक्षक देण्यासाठी प्रयत्नात होतो. येत्या चार ते पाच दिवसात पुनाडे शाळेला एक शिक्षक देण्यात येणार आहे.
-प्रियंका पाटील,
गटशिक्षणाधिकारी, उरण पंचायत समिती.