• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाड आगारात साठलेल्या सांडपाण्यामुळे एसटी महामंडळाच्या आठ कर्मचाऱ्यांना डेंग्यूची लागण!

ByEditor

Aug 13, 2024

मिलिंद माने
महाड :
महाड आगारात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे व त्यात पावसाचे पाणी साठून डासांची उत्पत्ती झाल्याने एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांना डेंग्यूची लागण झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

कोकणातील मध्यवर्ती एसटी आगार म्हणून महाड आगाराची ओळख मागील पन्नास वर्षापासून कायम आहे. मात्र, एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षपणामुळे महाड एसटी आगाराकडे मागील काही वर्षांपासून दुर्लक्ष केले गेले आहे. आधीच एसटी महामंडळाची जुनी इमारत डबघाईला आली आहे, त्यातच महामंडळाच्या जागेत नव्या इमारतीचे बांधकाम चालू झाले आहे. मात्र, महामंडळाकडे पैसे नसल्याने ठेकेदाराने काम अर्धवट सोडले आहे. परिणामी प्रवाशांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

महाड आगारातील जुन्या प्रवासी शेडपासून आगारातील वर्कशॉपपर्यंत मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साठले आहे. महाड एसटी आगाराच्या पाठीमागील बाजूस एका धनदांडग्या बिल्डरने मोठ्या प्रमाणावर भराव केल्याने एसटी महामंडळातून गटाराद्वारे वाहून जाणारे पावसाचे पाणी निचरा बंद झाल्याने आगारात मोठ्या प्रमाणावर साठून राहिले आहे. याला महाड नगरपरिषद कारणीभूत आहे. मात्र, नगरपरिषदेवर सध्या प्रशासकीय राजवट असल्याने ‘आंधळ दळतंय कुत्रं पीठ खातंय’ अशी अवस्था महाड नगरपरिषदेची झाली आहे.

महाड नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाचा कारभार ‘हम करे सो कायदा’ असल्याने त्याचा परिणाम एसटी महामंडळातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पावसाळ्यात अनुभवण्यास मिळाला. पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा निचरा बंद झाल्याने गुडघाभर पाण्यातून ऐन पावसाळ्यात प्रवाशांना एसटी बसमध्ये प्रवेश करावा लागत होता. अनेक वेळा नगरपरिषदेकडे तक्रार करून देखील बिल्डर धार्जिण्या नगरपरिषदेमुळे महाड एसटी आगाराला घाणीचे साम्राज्य प्राप्त झाले आहे.

महाड एसटी आगारात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साठून तळे निर्माण झाले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे व एसटी महामंडळाच्या बसेस स्वच्छतेमुळे निघणारे पाणी देखील त्या ठिकाणी साठून राहत असल्याने त्याचा परिणाम महाड एसटी आगारातील वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या कामगारांना भोगाव लागला. या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होऊन महाड एसटी आगारातील वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या सुमारे आठ कर्मचाऱ्यांना मागील पंधरा दिवसापासून डेंग्यूची लागण झाल्याने अनेक कर्मचारी रजेवर गेले आहेत.

महाड एसटी आगारातील वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डेंग्यूची लागण झाली आहे. महाड आगारात साठलेल्या सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी एसटी महामंडळाच्या पेण येथील विभागीय कार्यालयाने देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने याचा मनस्ताप एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना भोगाव लागला व परिणामी त्याचे रूपांतर डेंग्यूने बाधित कर्मचाऱ्यांमध्ये झाले. तरी देखील एसटी महामंडळाचे अद्यापही डोळे उघडले नाहीत. अखेर आज खड्डे भरण्याचे नावाखाली जेसीबी यंत्राने साठलेल्या पाण्याचा निचरा करण्याची बुद्धी एसटी महामंडळाला आल्याने कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र, पावसाने उसंत घेतल्याने महाड आगारात आज पाणी कमी होते. अजून एक महिना पावसाचा असल्याने पुन्हा एकदा पाऊस पडल्यावर आगारात पाणी साठणार नाही का? असा प्रश्न कर्मचाऱ्यांसह प्रवासी विचारीत आहेत.

नगरपरिषद फवारणी करणार का?

महाड एसटी आगारात साठलेल्या सांडपाण्यामुळे आगारातील वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डेंग्यूची लागण झाली असताना मात्र महाड नगरपरिषद अद्यापही सुस्त अवस्थेत झोपी गेली आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उभा राहत आहे. साठलेल्या सांडपाण्याचा निचरा होण्याबाबत नगरपरिषदेने देखील गांभीर्याने दखल घेणे गरजेचे असताना व त्या ठिकाणी डास प्रतिबंधक धुराची फवारणी व कीटकनाशकाचा वापर करणे अपेक्षित होते, मात्र नगरपरिषद देखील डेंग्यूची साथ पसरवण्यास हातभार तर लावत नाही ना? अशी शंका या निमित्ताने उपस्थित होत आहे.

एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये डास प्रतिबंधक फवारणी करणार

महाड एसटी आगारातील वर्कशॉपमध्ये साठलेल्या सांडपाण्यामुळे या वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्या ठिकाणी महाड नगरपरिषदेमार्फत डास प्रतिबंधक फवारणी करणार असल्याचे महाड नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय कोळेकर यांनी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!