• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कुलदैवतांच्या घटस्थापनेकरीता आलेल्या भागोजी खैरे यांच्यावर काळाचा घाला! धाटाव गाव शोकसागरात

ByEditor

Oct 3, 2024

मुंबई-गोवा महामार्गावर कारच्या धडकेत दुचाकीचा चक्काचूर; कारचालक फरार

सामाजिक आणि समाजपयोगी कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेणारे आमचे खैरे (आण्णा) हरपले; धाटाववासियांची प्रतिक्रिया

शशिकांत मोरे
धाटाव :
कुलदेवतेच्या घटस्थापनेकरीता आलेल्या रोहा तालुक्यातील धाटाव गावचे सामाजिक कार्यकर्ते भागोजी खैरे यांच्यावर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोटणेर नाक्यावर काळाने घाला घातला. मुंबई बाजूकडून माणगाव बाजूकडे भरधाव वेगाने निघालेल्या फोर्ड कंपनीच्या इंडिवेअर टायटॅनियम कारने दुचाकीवर असलेल्या खैरे यांना मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीसह त्यांना अक्षरशः अंदाजे ३०० मीटर फरफटत नेले. डोक्याला आणि हाता, पायाला गंभीर दुखापत झालेल्या खैरे यांना नजीकच्या इस्पितळात उचाचारासाठी आणले असता त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर कारचा चालक आणि सहकारी यांनी घटनास्थळावरून पळ काढला असून फरार झाले आहेत. मात्र वारंवार होत असलेल्या या गंभीर अपघातांमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील रक्ताचा अभिषेक थांबणार तरी कधी? असा सर्वसामान्य नागरिक वर्गातून सवाल होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज गुरुवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३० वाजता मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूरनजिक पोटणेर गावात रोहा तालुक्यातील धाटाव गावचे सामाजिक कार्यकर्ते भागोजी मालू खैरे (६७) हे आपल्या हिरोहोंडा कंपनीची पॅशन प्रो क्र. एमएच ०६ बीसी १४०५ या दुचाकीवरून आपल्या कुलदेवतेच्या घटस्थापनेकरीता एकटेच निघाले होते. मुंबई गोवा महामार्गावर पोटणेर गावानजीक आले असता रस्त्याच्या डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जाण्यासाठी थांबून मागून कोणीही येत नसल्याची खात्री करीत इंडिकेटर देत रस्ता पार करत असताना मागून भरधाव वेगाने, बेदरकारपणे, हायगयीने, रस्त्याकडे दुर्लक्ष करून निघालेल्या फोर्ड कंपनीच्या इंडिवेअर टायटॅनियम कार क्र. एमएच ०२ ईई ७५२० ने दुचाकीवर असलेल्या खैरे यांना मागून जोरदार धडक दिली. जबरी धडक बसल्याने दुचाकीसह त्यांना अक्षरशः अंदाजे ३०० ते ४०० मीटर अंतरावर फरफटत नेले. रस्त्यालगत झालेल्या अपघाताच्या जोरदार आवाजाने भयभीत झालेल्या ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी त्यांच्या डोक्याला, नाकाला आणि हाता, पायाला गंभीर दुखापत झालेल्या खैरे यांना नजीकच्या इस्पितळात उपचारासाठी आणले असता त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, या अपघाताची प्रत्यक्षदर्शी उमेश शंकर खैरे (वय ४०, रा. धाटाव ता. रोहा) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. कुलदेवतेच्या स्थापनेकरिता पोटणेर गावात आलेल्या खैरे यांच्या दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. तर गंभीर दुखापत झाल्याने जागोजागी रक्त सांडलेले पहावयास मिळाले. देवाच्या पूजेसाठी आणलेले साहित्यही इतरत्र पडलेले दिसून आले. घडलेल्या अपघाताबाबत माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या अपघाताबाबत माणगावचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. मात्र सामाजिक आणि समाजपयोगी कार्यक्रमात हिरीरीने सहभागी होणारे आमचे खैरे (आण्णा) आज आमच्यात नाहीत याचे अतीव दुःख असून मन मानायला तयार नाही असा शोक अनेकांनी व्यक्त केला. त्यांच्या पार्थिवावर असंख्य नातेवाईक, चाहते, मित्र परिवार, ग्रामस्थांच्या उपस्थितीत धाटाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!