ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन
पुणे : वीज कंत्राटी कामगारांच्या अनेक समस्या राज्याचे मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री यांनी मीटिंग घेऊन सोडवल्या. मात्र, प्रत्यक्षात काही गंभीर समस्या सुटल्या नसून कंत्राटदार व अधिकारी यांच्या हितसंबंधामुळे कष्टकरी कामगार अडचणीत असल्याचे संघटना प्रतिनिधी यांनी लक्षात आणून दिल्यानंतर लवकरच भारतीय मजदूर संघाच्या वीज कंत्राटी कामगार संघाची राज्याचे मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक लावणार असल्याचे आश्वासन माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
पुणे येथे जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडकर यांच्या निवासस्थानी सुधीर मुनगंटीवार आले असता संघटनेच्यावतीने प्रदेश अध्यक्ष निलेश खरात, रोहन पवार, विकास माने, पश्चिम महाराष्ट्र समरसता गतीविधीचे रवी ननावरे आदी पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची अंमलबजावणी प्रशासकीय अधिकारी वर्गाने केली पाहिजे. शासन प्रशासनासोबत संवाद हवा संर्घष नको अशी अपेक्षा अध्यक्ष निलेश खरात यांनी व्यक्त केली.