पुणे : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातील एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. राज्यातील ३ हजार ३७३ केंद्रावर परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. परीक्षेचा निकाल १५ मे पर्यंत लावण्याचे उद्दिष्ट मंडळाने ठेवले आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएसचा लाइव्ह ट्रॅकिंग होणार आहे. परीक्षा केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरणही होणार आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॅाच असणार आहे.
दहा मिनिटे वेळ अधिक मिळणार
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरु होत आहे. यंदाही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा वेळ वाढवून दिला आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी २७१ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.